महिलेला डेंग्यूचेही निदान
पुणे – सिंहगड रस्त्यावर राहणाऱ्या एका 50 वर्षीय महिलेने करोनानंतर दृष्टी गमावल्याचा प्रकार समोर आला आहे. कोविड रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आठवडाभरातच त्या महिलेने 90 टक्के दृष्टी गमावली. करोना काळातच उद्भवलेल्या डेंग्यूमुळे रेटिनाची समस्या आल्याने दृष्टी गमावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आय सर्जन डॉ. आदित्य केळकर यांनी सांगितले, संबंधित महिलेला डोळ्यांचा रेटिनल वास्क्यूलिटिसचा त्रास आधीपासूनच होता. करोना काळातच तिला डेंग्यूही झाला. मात्र, तो सुरवातीला कळालाच नाही. त्यानंतर आम्ही अँटीबॉडिजसाठी रक्ताचे नमूने गोळा केले. त्यावेळी करोनासोबतच डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
महिलेची दृष्टी करोनामुळे गेली की डेंग्यूमुळे याबाबत आताच सांगणे कठीण आहे. परंतु, उपचारास त्या महिलेचा चांगला प्रतिसाद मिळत असून लवकरच तिची गेलेली दृष्टी तिला परत मिळेल, असा विश्वास डॉ. केळकर यांनी व्यक्त केला.
डेंग्यूच्या रुग्णांमध्ये रेटिनाबाबत समस्या दिसून येतात. या महिलेला सुरुवातीला डोळ्यांची जळजळ होत होती. डोळ्यांची जळजळ होणे हे करोनाचे वैशिष्ट्य असून त्यामुळे दृष्टी करोनामुळे गेली की डेंग्यूमुळे, याबाबत तपासाअंतीच समजू शकेल व ते निश्चितच आमच्यासाठी आव्हानात्मक असेल.
– डॉ. आदित्य केळकर, आय सर्जन