कराड – येथील बारा डबरी परिसरातील शिंदे मळ्यात डॉ. एम. पी. शिंदे यांच्या घरात मध्यरात्री दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकला. दरोडेखोरांनी 27 लाखांच्या रोख रकमेसह नेकलेस, मंगळसूत्र, अंगठी, चेन, कोल्हापूरी साज, पाटल्या, बांगड्या, ब्रेसलेट, लहान मंगळसूत्र, कानातील झुबे अशा 19 लाख रुपये किमतीच्या एकूण 48 तोळे वजनाच्या सोन्याचांदीच्या दागिन्यांचीं लूट केली. दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद झाले असून तपासासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. सोमवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात पाहणी केली. पोलिसांनी अधिक तपासासाठी श्वानपथकासही पाचारण केले.
याबाबत पूजा राजेश शिंदे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बारा डबरी परिसरातील शिंदे मळा येथे डॉ. राजेश शिंदे व पूजा शिंदे हे दाम्पत्य कुटुंबासह वास्तव्यास आहे. त्यांनी वैद्यकीय खर्चासाठी पै- पाहुणे, नातेवाइकांकडून गेल्या काही दिवसात पैसे गोळा केले होते. या पैशांसह बॅंकेच्या लॉकरमध्ये असलेले दागिनेही नातेवाईकाच्या विवाहास जाण्यासाठी त्यांनी घरात आणून ठेवले होते.
रविवारी दि. 9 रोजी रात्री नेहमीप्रमाणे सर्वजण झोपी गेले. डॉ. राजेश बंगल्यातील पहिल्या बेडरूममध्ये, तर पत्नी पूजा या मुली व आईसमवेत दुसऱ्या बेडरूममध्ये झोपल्या होत्या. पहाटे तीनच्या सुमारास पूजा यांना पती राजेश यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने त्या उठून बाहेर आल्या. जिन्यावरून बेडरूमकडे जाताना जिन्यावर त्यांना दोघांनी अडवले. बेडरूममध्ये आणखी तीन ते चारजण असल्याचे पूजा यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित दरोडेखोरांनी डॉ. राजेश व पूजा यांना चाकूचा धाक दाखवून बेडरूममध्ये नेले. इतर कुटुंबीयांनाही बेडरूममध्ये थांबवून ठेवले.
याचदरम्यान दरोडेखोरांनी पूजा यांच्यासह त्यांची आई व नणंदेच्या गळ्यातील व कपाटात ठेवलेले 48 तोळे वजनाचे 19 लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने आणि 27 लाख रुपयांची रक्कम काढून घेत बंगल्याला बाहेरून कड्या घालून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तपासाच्या दृष्टीने पोलीस पथके तयार करून ती विविध ठिकाणी रवाना केली. कराड शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी तपास करीत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण केले होते. परंतु, पावसामुळे श्वानपथकाला कोणताही सुगावा लागला नाही. डॉ. शिंदे यांचे निवासस्थान व परिसरातील रस्त्यांवर असलेले सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी तपासले आहे.