मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला, देशातील जनतेने 2014 आणि 2019मध्ये मोठ्या अपेक्षेने ‘दत्तक’च घेतले होते. प्रचंड बहुमताने देशाची सूत्रे तुमच्याकडे सोपविली, परंतु जनतेचा आता भ्रमनिरास झाला आहे, असे शरसंधान ठाकरे गटाने केले आहे.
वाराणसी लोकसभा मतदारसंघातून मोदी यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरला. हा अर्ज भरण्यापूर्वी ते काही काळ त्यांच्या आईच्या आठवणींनी भावूक झाले. त्यांच्या आईंचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले. आतापर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मोदी त्यांच्या आईचा आशीर्वाद घेत असत.
यंदा ती पोकळी जाणवल्याने त्यांना गहिवरून आले. हे अगदीच स्वाभाविक आहे. त्याच भावनेच्या भरात मोदी पुढे असे म्हणाले की, ‘आपल्या आईनंतर गंगा हीच माझी आई आहे आणि मला ‘गंगामय्या’ने दत्तक घेतले आहे’, असे ठाकरे गटाच्या मुखपत्रातून समाचार घेण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात मोदी यांनी अयोध्येतील राममंदिरात प्रभू श्रीरामांना साष्टांग दंडवत घातले. आता मंगळवारी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी ‘गंगामय्या’ची आरती केली. ‘गंगामय्याने आपल्याला दत्तक घेतले आहे,’ अशी भावनिक साद उत्तर प्रदेशातील जनतेला घातली, दत्तक‘विधान’ केले हे उघड आहे.
गंगामय्याने तुम्हाला दत्तक घेतले आहे की नाही, याची कल्पना नाही, पण जनतेने तुमचे दत्तक विधान रद्द करण्याचे ठरविले आहे, हे मात्र नक्की, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.
आतापर्यंत लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहेत आणि त्यातील मतदानाचे कल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चार सौ पार’च्या गर्जना पोकळ ठरविणारे आहेत. मोदी यांनी वारंवार आवाहन करूनही उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मतदानाचे आकडे वाढताना दिसलेले नाहीत, याकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले आहे.
उत्तर प्रदेशात ना राममंदिराची लाट मतदानात दिसली ना विकसित भारताची. मोदी यांनी मतदानाच्या प्रत्येक टप्प्यात प्रचाराची वेगवेगळी शस्त्र बाहेर काढली, मात्र सगळीच वाया गेली. दिल्लीचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो. त्यामुळे हे परवडणारे नाही, याची जाणीव मोदी यांना झाली असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.