लोणी काळभोर, दि. 16 (वार्ताहर) -येथे गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडील एक गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे, एक कोयता व एक तलवार अशी घातक हत्यारे मिळून आली आहेत.
याप्रकरणी फैजान उर्फ बबलू शकील अन्सारी (वय 22, रा. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) यास अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि. 15) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय जगताप, पोलीस हवालदार रौफ इनामदार, मुकुंद आयचीत, विजय कांचन, धीरज जाधव, अक्षय जावळे हे पोलीस पथक लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीत संचारबंदी पेट्रोलिंग करीत होते.
यावेळी धोंडगे यांना गुप्त सुत्रांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथक इंदीरानगर चौकात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्या कंबरेला 50 हजार रुपये किमतीचे एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तूल, 3 जिवंत काडतुसे, पिशवीमध्ये पितळी मूठ असलेली लोखंडी तलवार व लोंखंडी कोयता अशी एकुण 51 हजार 500 रुपये किमतीची घातक शस्त्रे मिळून आली ती जप्त करण्यात आली आहेत.
अन्सारी याच्यावर 2017 मध्ये हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न करणे, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात विनापरवाना अवैधपणे पिस्तुल बाळगणे व 2018 मध्ये खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या घटनेचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.