Lok Sabha Election 2024 | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून महाराष्ट्रामधील पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्यातील सात जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहे.
अपेक्षेप्रमाणे कोल्हापूरमधून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, तर पुण्यामधून आमदार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. यामुळे पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसकडून आज पक्षाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून यात ५७ उमेदवारांची नावे आहेत. राज्यातून नंदुरबार, अमरावती, नांदेड, पुणे, लातूर, सोलापूर आणि कोल्हापूर या जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. नंदुरबारमधून गोवळ पडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर लातूरमधून शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
या यादीत कर्नाटकमधील सर्वाधिक १७ उमेदवार असून पाठोपाठ गुजरातमधील ११ उमेदवार आहेत. याशिवाय प. बंगालमधील ८, महाराष्ट्रामधील ७, राजस्थानमधील ६, तेलंगणातील ५, अरुणाचल प्रदेशातील २ आणि पद्दुचेरीमधील १ जणाचा समावेश आहे.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरमधील एका सभेत त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते. तसेच प्रणिती शिंदे यांच्या नावाचे बटन दाबून आपल्याला त्यांना लोकसभेत पाठवायचे आहे, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले होते.