नेवासा – पूर्वीच्या गुन्ह्यात मूळ फिर्यादीला साथ दिली या रागातून विठ्ठल डोईफोडे व त्यांच्या भावास कुऱ्हाड, लोखंडी पाईपच्या सहाय्याने जबर मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना नेवासा सत्र न्यायालयाने सात वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. (Nevasa: Attempted murder accused sentenced to 7 years rigorous imprisonment)
आरोपी निवृत्ती भाऊसाहेब कजबे, सखाराम भाऊसाहेब कजबे, (दोघे रा.धनगरवाडी, ता.नेवासा) व राहुल नवनाथ पाटोळे (रा. ब्राम्हणी, ता.राहुरी) यांनी दि. २२ मे २०१५ रोजी फिर्यादी विठ्ठल डोईफोडे याने पोक्सोच्या गुन्ह्यात त्या गुन्ह्यातील मूळ फिर्यादीस आरोपींविरुध्द मदत केली होती. त्याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी विठ्ठल डोईफोडे व त्यांच्या भावास कुऱ्हाड, लोखंडी पाईपच्या सहाय्याने जबर मारहाण करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला.
त्यावरून आरोपींविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचा तपास होऊन नेवासा पोलीस ठाण्याचे तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस.जी.जोशी यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्यात चौकशीकामी एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, डॉक्टर व जखमी साक्षीदार यांचे जबाब महत्वाचा पुरावा ठरला.
साक्षी-पुरावे व युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने गुन्ह्यात दोषी धरून आरोपींना ७ वर्षे सश्रम कारावास व १० हजार प्रत्येकी दंड तसेच भादवी कलम ३२३ अन्वये ३ महिने व १ हजार दंड, तसेच कलम ५०४ अन्वये ३ महिने कारावास व प्रत्येकी १ हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाच्या रक्कमेपैकी ३० हजार इतकी रक्कम जखमी साक्षीदारास देण्याचे आदेश केले.
खटल्यात सरकारपक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता चंद्रकांत सपकाळ यांनी काम पाहिले. त्यांना अति.सरकारी अभियोक्ता मयुरेश नवले,अति.सरकारी अभियोक्ता व्ही. के. भोर्डे यांनी सहकार्य केले. पैरवी अधिकारी ए.एस.आय. नरेश चव्हाण, पो.कॉ. सुभाष हजारे यांचे सहकार्य लाभले.