प्रशासकीय पातळीवर विचार : गर्दी टाळण्याचे प्रयत्न
पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात गर्दी टाळण्यासाठी आठवड्यातील दोन दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा विचार प्रशासनाच्या पातळीवर सुरू आहे. याविषयी राज्य शासन, दोन्ही मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे करोनाची साखळी तोडण्यास मदत होईल, अशा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
करोनाच्या सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या ऑनलाइन पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी सौरभ राव यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे पालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे उपस्थित होते.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे नागरिकांची गर्दी वाढली. करोनाच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेला लॉकडाऊन शुक्रवारी संपत आहे. तर, राज्य शासनाच्या लॉकडाऊनची मुदत दि.31 जुलैपर्यंत आहे. त्यामुळे याआधीचे नियम लागू असणार आहे. या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी सर्वच यंत्रणांकडून कोणत्या उपाययोजना करता येईल, यावर विचार सुरू आहे. याआधीच जिल्हाधिकारी यांनी आठवड्यातील दोन दिवस लॉकडाऊन लागू करण्याचे संकेत दिले होते.
याविषयी राव म्हणाले, “यापूर्वी शनिवार, रविवारी लॉकडाऊन लागू करण्यात यावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली होती. त्यानंतर व्यापाऱ्यांनी पुन्हा सुधारित पत्र दिले. त्यामध्ये मंगळवारी आणि बुधवारी लॉकडाऊन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांशी चर्चा करून लॉकडाऊनसाठी आठवड्यातील दोन दिवस निश्चित केले जाणार आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागासाठी एकच धोरण असणार आहे. याविषयी अंतिम निर्णय सर्व घटकांशी चर्चा करून घेतला जाणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासन काय निर्णय घेते, याकडे पुणेकरांचे लक्ष आहे.
दहा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये काय केले?
– मागील 10 दिवसांत शहरात करोनाच्या चाचण्यांची संख्या वाढवली.
– कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात आला.
– होम आयसोलेशन आणि बेड्सची संख्या वाढविण्यात आली आहे.
– दि. 16 ते दि. 21 जुलै याकालावधीत पुणे शहरात 37 हजार 349 टेस्ट घेण्यात आल्या. देशात सर्वाधिक चाचण्या पुण्यात घेण्यात आल्या.