लॉकडाऊनचा टेलरिंग व्यवसायाला मोठा आर्थिक फटका
कात्रज – लॉकडाऊनचा फटका सर्वच छोट्या मोठ्या उद्योगांना बसलेला असताना बारा बलुतेदारांपैकी एक असलेल्या शिंपी व्यावसायिकांचा म्हणजे टेलरिंग व्यवसायही तोट्यात आला आहे. स्टायलीश कपडे शिवणारे ते अगदी रफू, पिकोफॉल, किरकोळ शिवणकाम करणारे व्यावसायिकही यामुळे अडचणीत आले आहेत. टेलरिंग दुकाने सुरू झाली असली तरी लग्नसराईचा सिझन गेल्याने नवे कपडे शिवायला कोणी येत नसल्याचे चित्र आहे. यामुळे या व्यावसायिकांकडून मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत अनेक सिझनेबल व्यवसाय बंद होते. त्यामुळे य काळात होणारी हजारो, लाखोंची उलाढाल बंद असल्याने टेलरिंग व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत लग्नाचे मुहूर्त असतात परंतु, याच कालावधीत लॉकडाऊन असल्याने याचा परिणाम अन्य व्यवसायांसह टेलरिंग व्यवसायावरही झाला आहे.
लग्नसराईत या व्यवसायात मोठी उलाढाल होत असते. रात्रंदिवस काम करून ऑर्डर पूर्ण करण्याची लगबग असते. परंतु, यावर्षी करोनाचे मोठे संकट असल्याने लॉकडाऊन काळात दोन महिने टेलरिंग व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवावा लागला. यामुळे शिंपी समाजातील अनेकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे समाजातील व्यावसायिक व कारागिरांना आर्थिक सहाय्य करण्यात यावे, शिवणकाम वाढविण्यासाठी विनातारण कर्ज द्यावे, महिलांना टेलरिंग व्यावसायिकांना बिनव्याजी कर्ज द्यावे, शिंपी समाज विकास कौशल्य महामंडळ स्थापन करावीत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
उपनगरांत दुकान भाडेतत्त्वावर घेऊन टेलरिंगचा व्यवसाय करणारे अनेक टेलर आहेत, कपडे व्यावसायिकांकडून येणाऱ्या ऑर्डरनुसार शिवणकाम करणाऱ्यांची टेलर्सची संख्या मोठी आहे.
टेलरिंग करणारा शिंपी समाज आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब आणि कमकुवत आहे. रेडिमेड कपड्यांच्या स्पर्धेत आमचे समाजबांधव कौशल्यपणाला लावून पिढीजात शिवणकामाच्या व्यवसायावर उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु, लॉकडाऊनमुळे अनेकांची उपासमार होत आहे. समाजाला मदत करण्याबाबत सरकारकडे आम्ही पाठपुरावा करणार आहोत.
– संदीप लचके, अध्यक्ष, नामदेव समाजोन्नती परिषद