लॉकडाऊनमुळे नैराश्‍यवाढ

लहान मुलांचे स्क्रीनटाईम वाढल्यामुळे मानसिकताण वाढला

– संजय कडू

पुणे – करोनामुळे नागरिकांना दोन ते अडीच महिने घरातच राहावे लागले. सुरुवातीला ही बाब एन्जॉय केली. नागरिकांनी जास्तीत जास्त वेळ टी.व्ही., मोबाइल आणि लॅपटॉपवर घालवण्यास प्राधान्य दिले. यामुळे लहान-मोठ्या व्यक्‍तींमधील संवाद कमी झाला. याचा परिणाम लहान मुलांमध्ये नैराश्‍य निर्माण होण्यात झाला. स्क्रीन ऍडिक्‍ट मुले छोट्या मोठ्या गोष्टींवरून चिडचिड करू लागली. नकळत्या वयात ती टोकाचे निर्णय घेण्यापर्यंत गेली. यापुढील काळात तर शिक्षणही काही महिने ऑनलाइन सुरू असणार आहे. यामुळे मुलांचा स्क्रीनटाईम आणखी वाढणार आहे. याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होऊ शकतो.

बिबवेवाडी परिसरात एका 13 वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पालकांनी टीव्हीवरील कार्टुन बंद केल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. नकळत्या वयातही त्याने ओढणी घेऊन गळफास घेतला. ही बाब सर्वच पालकांना विचार करायला लावणारी आहे. कारण, लॉकडाऊनमध्ये मुलांचा वाढलेला स्क्रीनटाईम अचानक कमी करण्याचा प्रयत्न पालकांनी केल्यास बहुतांश मुले नैराश्‍यात जाऊन टोकाचे पाऊल उचलण्याची शक्‍यता आहे. तर, दुसरीकडे बहुतांश शाळा ऑनलाइन सुरू झाल्याने मुले दिवसभर लॅपटॉप, मोबाइल आणि टॅबच्या स्क्रीनवर व्यस्त असणार आहे.

मुलांची ऑनलाइन पद्धतीने सकाळी 9 वाजता सुरू झालेली शाळा दुपारी 4 वाजेपर्यंत चालते. यामुळे एकाजागी बसल्याने तसेच सतत स्क्रीनकडे बघितल्याने शारीरिक आरोग्यावरही परिणाम होणार आहे. याचबरोबर मोबाइल आणि टॅबवर ऑनलाइन शिकवणी वर्ग झाल्यानंतर पुढे कार्टुन आणि मनोरंजनाचे कार्यक्रम बघण्यासाठी मुले वापरतात. यामुळे मुले दिवसभरातील 8 ते 10 तास स्क्रीन पुढून हटत नाहीत.

यामुळे त्यांचा दिवसभरात पालकांशी असलेला संवाद कमी होत जातो. तसेच, करोना भीतीमुळे मैदानी खेळ बंद झाल्याचा मानसिक परिणामही तितकाच होताना दिसतो.

घराघरांमध्ये लहान मोठ्या व्यक्‍तींना टीव्ही, मोबाइल, इंटरनेट आदींचे वेड लागले आहे. पालकही “वर्क फ्रॉम होम’ असो व इतर कारणांमुळे जास्तीत जास्त वेळ डिजिटल स्क्रीनसमोर शेअर करत आहेत. याचे अनुकरण मुले जाणते अजाणतेपणी करत असतात. मुले इंटरनेटचा वापर करताना काय पाहात आहेत? यावर पालकांनी लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे. त्यांच्याशी जास्तीत जास्त संवाद साधून त्यांना मैदानी खेळांकडे वळवले पाहिजे. त्यांना तंत्रज्ञानाचा धोका समजावून सांगितला पाहिजे.
– अजय दुधाणे, आनंदवन व्यसनमुक्‍ती केंद्र

Leave A Reply

Your email address will not be published.