तळेगाव दाभाडे – ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या शासनाच्या मोहिमेंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत करोना रॅपिड अँडजेन टेस्ट उद्या, गुरुवारी (दि. 24) संपूर्ण तळेगावात शहराच्या हद्दीत राबविण्यात येणार असून, त्या दिवशी एक दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन असेल, अशी माहिती मावळ-मुळशीचे प्रांत संदेश शिर्के यांनी दिली. तळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृहामध्ये मंगळवारी (दि. 22) झालेल्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते.
यावेळी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, तळेगावच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, मुख्याधिकारी रवी पवार, वैद्यकीय अधिकारी गुनेश बागडे, उपमुख्य अधिकारी सुप्रिया शिंदेसह नगरपरिषदेतील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये राबविण्यात येणाऱ्या अँटिजन टेस्टबाबतच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. याबाबत संपूर्ण तळेगावातील 13 प्रभागांमध्ये पूर्ण नियोजन करण्यात आले आहे.