लॉकडाऊन म्हणजे राहिलेली कामे पुर्ण करण्याची संधी (बोला बिनधास्त)

लॉक डाऊन म्हणजे राहिलेली कामे पुर्ण करण्याची संधी असे मला वाटतं. अनेकांना घरी बसुन कंटाळा आला आहे मात्र मला तसे अजिबातच जाणवत नाही इतर दिवसाप्रमाणेच मी रोजच्या कामांचे योग्य नियोजन करत असल्याने हा वेळ मला चांगलाच उपयुक्त ठरत आहे. साधारणपणे वाचन, लेखन करण्याबरोबरच मी काही उपयुक्त चित्रपट पाहणे, ऑनलाईन काही सेशन ऐकणे ही कामे करत आहे त्यामुळे वेळ अगदी छान जातोय.

१ ते १४ एप्रिल या काळात आपल्या मित्रांना सोशल मीडियाच्या माध्यमाने रोज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित एक Pdf स्वरूपातील पुस्तक पाठवण्याचा छोटा उपक्रम राबवत आहे. कामाव्यतिरिक्त फावल्या वेळेत अभ्यासाचे आणि विविध उपक्रमांचे नियोजन करत असल्याने अनेकांशी संपर्क होत आहे त्यामुळे स्वतःला व्यस्त ठेवता येत आहे. बऱ्याच दिवसापासून राहिलेली घरातील छोटी मोठी कामे पुर्ण करण्याची उत्तम संधी मिळाली आहे.

बऱ्याचदा आपल्याला आपल्यातील कौशल्य, कला इतरांना दाखवण्याची संधीच मिळत नाही त्यामुळे मिळालेल्या संधीचा पुर्णपणे उपयोग करत सर्वांना घरी राहुन ह्या गोष्टी नक्कीच करता येतील शिवाय यामाध्यमाने आपण शासनाला देखील नक्कीच सहकार्य करू. लॉक डाऊनमुळे दोन महत्त्वाच्या गोष्टी मला पुन्हा नव्याने समजण्यास मदत झाली ती म्हणजे समाजातील काही घटक प्रामुख्याने डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी यांनी खंबीरपणे ह्या परिस्थितीचा सामना केला नसता तर आज समाजात अराजकता पसरली असती. त्यामुळे आपण कायमच ह्या समाज घटकांचे ऋणी असणे गरजेचे आहे त्याचबरोबर सरकार कितीही खंबीरपणे निर्णय घेत असली तरीही नागरिकांनी सहकार्य न केल्यास कोणत्याच उपाययोजना प्रभावी ठरणार नाही. सद्यस्थितीत वैयक्तिक, कौटुंबिक, राजकीय मतभेद जरी असले तरी एकत्रितपणे जर या संकटाचा सामना न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे कोरोना सारख्या संकटकाळी मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग करत शासनाला सहकार्य करणे मला महत्त्वाचे वाटते…

– अविनाश पाटील

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.