नवनगर विकास प्राधिकरणासाठी अनेकांचे प्रयत्न
पिंपरी – अवघ्या सव्वा दोन वर्षांवर आलेल्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरातील कार्यकर्त्यांना अजित पवारांकडून बळ दिले जाण्याच्या शक्यतेने राज्य शासनाच्या महामंडळांसाठी स्थानिक नेतेमंडळींमध्ये चुरस निर्माण झाली आहे. बहुतांश नेत्यांनी नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदासाठी प्रयत्न चालविले असून अजित पवार शहरातील कोणा-कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ताबदल झाल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून सत्तेबाहेर असलेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सत्तेच्या केंद्रस्थानी आला. राज्यात महाविकास आघाडीतील महामंडळाच्या वाटपानंतर सुमारे 25 महामंडळे राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहेत.
महापालिकेवर 15 वर्षे सत्ता गाजविल्यानंतर सन 2017 साली महापालिकेतून राष्ट्रवादी हद्दपार झाली होती. राज्यात सत्ता आल्यानंतर शहरातील कार्यकर्त्यांना बळ देऊन सन 2022 साली होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याचे मनसुबे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी रचले आहेत. मात्र सत्तेबाहेर राहून महापालिकेवर सत्ता आणणे तितके शक्य नसल्यामुळे राज्य शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या महामंडळावर स्थानिक महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावून त्यांना ताकद देण्यात येणार आहे. त्यामुळे सत्तेबाहेर असलेल्या काही स्थानिक नेत्यांचे पुनर्वसन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरातील महत्त्वाचे असलेल्या नवनगर विकास प्राधिकरणावर राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात लोकनियुक्त अध्यक्ष नेमण्यात आला नव्हता. यावेळी मात्र प्राधिकरणावर अध्यक्ष नियुक्त केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या अध्यक्षपदासाठी मोठी चुरस पहावयास मिळत आहे. त्यातच भाजपासोबत जात अजित पवारांनी केलेल्या बंडाला शेवटपर्यंत आमदार अण्णा बनसोडे यांनी पाठिंबा दिला होता, त्यामुळे त्यांचीही एखाद्या महामंडळावर वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अण्णा बनसोडे यांच्याबरोबरच माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. यातील किमान दोघांची दोन महामंडळावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात लवकरच राज्यमंत्री पदाच्या दर्जाची दोन मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवार नेमकी संधी कोणाला देतात याकडे लक्ष लागले आहे.
राहुल कलाटे, सुलभा उबाळेही शर्यतीत
राज्यात महाविकास आघाडीच्या सत्तेमुळे शिवसेनेच्याही कोट्यात 27 महामंडळे आली आहेत. शिवसेनेकडून पालिकेतील या पक्षाचे गटनेते राहुल कलाटे, माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांची नावे अग्रस्थानी आहेत. तर गजानन चिंचवडे आणि योगेश बाबर यांच्याबाबतची शहर पातळीवर चर्चा सुरू आहे. यापैकी कोणाला महामंडळावर संधी दिली जाणार हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.