भाजपच्या खांद्यावर बंदूक ठेवून लोजपचा नितीश यांच्यावर निशाणा

बिहार निवडणुकीत जेडीयूपेक्षा अधिक जागा लढवण्याचे आवाहन

नवी दिल्ली – बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने जेडीयूपेक्षा अधिक जागा लढवाव्यात, असे आवाहन लोक जनशक्‍ती पक्षाने (लोजप) केले आहे. त्यामुळे भाजपच्या खांद्यावर बंदूक ठेवून लोजप मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधत असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे बिहारमधील सत्तारूढ एनडीएतील अस्वस्थता कायम असल्याचेही सूचित होत आहे.
बिहारमध्ये सत्तेवर असणाऱ्या एनडीएमध्ये आतापर्यंत मोठ्या भावाची भूमिका जेडीयूने निभावली आहे.

मात्र, त्या राज्यातील निवडणूक तोंडावर आली असतानाच लोजपकडून मांडल्या जाणाऱ्या भूमिकेमुळे एनडीएत सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपासून लोजप सातत्याने नितीश यांच्या कार्यपद्धतीची खिल्ली उडवत आहे.

अशातच बुधवारी येथे लोजपच्या खासदारांची बैठक झाली. त्या बैठकीतही करोना संकट, स्थलांतरित कामगारांचा पेच आणि पूरस्थिती हाताळणीवरून नितीश यांना लक्ष्य करण्यात आले. मित्रपक्ष असणाऱ्या जेडीयूविरोधात आगामी निवडणुकीत उमेदवार देण्याच्या विचारावरही बैठकीत चर्चा झाली. मात्र, त्यावर कुठला निर्णय घेण्यात आला नाही.

दरम्यान, लोजपच्या सूत्रांनी पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी मंगळवारी भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतल्याची माहिती दिली. त्या भेटीत पासवान यांनी भाजपने जेडीयूपेक्षा अधिक जागा लढवण्याचे आवाहन केले. त्यावर भाजपकडून तातडीने कुठली प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

मात्र, लोजप आणि भाजपने जागावाटपावेळी पासवान यांच्याप्रमाणे भूमिका घेतल्यास जेडीयूची आणि अर्थात नितीश यांची कोंडी होण्याची शक्‍यता आहे. विविध मुद्‌द्‌यांवरून लोजप आणि जेडीयूमधील संबंध ताणले गेले आहेत. त्याचा लाभ भाजपला मिळणार का, हे पुढील काळात स्पष्ट होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.