मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबई येथे घेतलेल्या सभेमध्ये भाजप, मनसे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाणा साधला होता. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या शनिवारच्या भाषणानंतर राजकीय वर्तुळामध्ये अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भाषणाचे कौतुक केले आहे तर विरोधी भाजपने हे भाषण म्हणजे टोमणे बॉम्ब असल्याचा निशाणा साधला आहे. अशातच शनिवारच्या सभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांच्या विशेष निशाण्यावर असल्याचं पाहायला मिळालं.
फडणवीस यांनी देखील लागलीच ट्विट करत, ‘जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा’ असा इशारा दिला होता. अशातच आज मुंबई येथे फडणवीस यांची सभा होणार असून आज मुख्यमंत्र्यांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर फडणवीसांचे ट्विट
देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर ट्विट करत त्यांच्या भाषणाची “सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत. सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम… अरे छट. हा तर निघाला आणखी एक टोमणे बॉम्ब.” अशी टर उडवली होती. तसेच “जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा” असा इशाराही दिला होता. याच पार्श्वभूमीवर आता फडणवीस ‘ठोक के’ काय प्रत्युत्तर देणार याबाबत चर्चा सुरु आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या सभेसाठी आलेल्या सर्वांना भगव्या रंगाच्या टोप्या आणि हनुमान चालिसेची पुस्तिका दिली जात आहे. एकंदरीतच शिवसेनेच्या शनिवारच्या विरोट सभेनंतर भाजपाकडून देखील जोरदार तयारी करण्यात आली आहे. सभेच्या ठिकाणी मोठ्यासंख्येने भाजपाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते दाखल होत आहेत.