लखनौ – उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात अनोखा लग्न सोहळा संपन्न झाला आहे. तीन फुटाच्या वराचा अडीच फुटाच्या वधूशी विवाह झाला. हा अनोखा विवाह पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते. उपस्थितांनी दोघांनाही आशीर्वाद देऊन सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. लग्नानंतर वराने नववधूला घेऊन स्कॉर्पिओ गाडीत बसवून घेऊन गेला. हे प्रकरण रामपूर जिल्ह्यातील शाहाबाद भागातील आहे.
शाहबादच्या मोहल्ला फर्राशन येथे राहणारे नबील खान यांची मुलगी तहसीन (29) हिची उंची खूपच कमी आहे. त्यामुळे तिच्या वैवाहिक जीवनासाठी अडचण निर्माण झाली होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार तहसीनची उंची फक्त अडीच फूट आहे. त्यामुळे तिचे लग्न होऊ शकले नाही. कुटुंब हतबल झाले होते आणि त्यांनी लग्नाची आशा सोडली होती. काही महिन्यांपूर्वी संभल जिल्ह्यातून तहसीनसाठी एक लग्नाची बोलणी करण्यासाठी नातेवाइक आले होते. वराची उंचीही तहसीनसाठी योग्य होती. यानंतर कुटुंबात आनंदाची लाट उसळली.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, वराची रेहान खान (वय 30) उंची तीन फूट असून ते वधूच्या शोधात होते. दोघांनाही पाहिजे असलेले व्यक्ती मिळाले आणि शनिवारी दोघांचा विवाह झाला. शाहबाद येथील एका मॅरेज हॉलमध्ये झालेल्या अडीच फुटाची वधू आणि तीन फुटाच्या वराच्या लग्नाची चर्चा सर्वत्र होत आहे.