पालघर – पालघरमध्ये 28 वर्षीय लिव्ह-इन पार्टनरच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आधी महिलेला पाण्यात बुडवून मारले. यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरून गुजरातमधील वलसाड येथील खाडीत फेकून दिला. या हत्येत आरोपीच्या पत्नीनेही साथ दिली होती, तिलाही पोलिसांनी अटक केली आहे.
मनोहर शुक्ला असे आरोपीचे नाव असून तो मुंबईत कॉस्टूम डिझायनर म्हणून काम करतो. मेकअप आर्टिस्ट नयना महतसोबत तो पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होता. नयना मनोहरवर लग्नासाठी दबाव टाकत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याने तसे करण्यास नकार दिल्याने तिने मनोहरविरुद्ध पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल केली. शुक्लाने केस मागे घेण्यास सांगितले. नयनाने नकार दिल्याने मनोहरने तिची हत्या केली.
अधिक माहितीनुसार, ही घटना 9 ते 12 ऑगस्टदरम्यान घडली. 14 ऑगस्ट रोजी पीडितेच्या बहिणीने नायगाव पोलिसात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, गुजरात राज्यातील वलसाड येथील एका खाडीत पीडितेचा मृतदेह सुटकेसमध्ये भरलेल्या अवस्थेत सापडला, असे एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.
वलसाडमधील पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूचा अहवाल दाखल करताना मृतदेह घेण्यासाठी कोणीही आले नसल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते, असे त्यांनी सांगितले.