नवी दिल्ली :- भारताचा वरिष्ठ टेनिसपटू रोहन बोपण्णाने यंदाच्या मोसमातील डेव्हीस करंडक टेनिस स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याचे संकेत दिले आहेत. डेव्हिस चषक स्पर्धेच्या जागतिक गटाच्या स्पर्धा लखनौ येथे 16 आणि 17 सप्टेंबर रोजी होणार आहे.
या स्पर्धेत भारताचा सामना मोरोक्कोशी होणार असून विजेता संघ जागतिक गट पात्रता फेरीच्या पहिल्या विभागात दाखल होणार आहे. या स्पर्धेत बोपण्णा भारताकडून अंतिम सामना खेळणार आहे. जवळपास दहा वर्षे देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या बोपण्णाने या स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान,नुकत्याच झालेल्या अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी सामन्यातील अंतिम फेरीत रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मॅथ्यू एब्देन यांना पराभव पत्करावा लागला होता. राजीव राम आणि ज्यो सॅलिसबरी यांच्या जोडीनं बोपण्णा आणि एब्देन यांचा 6-2,3-6,4-6 असा पराभव करत विजेतेपद मिळवले होते.