पालघर – तालुक्यात अपघातांची मालिका सुरू आहे. मागील तीन दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातांमध्ये आतापर्यंत सात जण जखमी झाले आहेत.
रविवार ४ फेब्रुवारी रोजी सकाळी चहाडे – गुंदले रस्त्यावर टायर फुटून कार उलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना सध्या बेटेगाव येथील अधिकारी लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागझरी येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी हे सर्व तरुण जात असताना हा अपघात घडला.
शुक्रवारी संध्याकाळी बोईसर चिल्हार रस्त्यावरील गुंदले दोन बंगला येथील क्रॉसिंगवर भरधाव स्कॉर्पिओ जीपने अचानक वळण घेणाऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेत तीन जण गंभीर जखमी झाले होते.
त्यापैकी बाळु हेमाडा यांचा वलसाड येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांची पत्नी सुरेखा हेमाडा आणि राजेंद्र आहडी या दोघांवर उपचार सुरू आहेत. तर शनिवारी पालघर मनोर रस्त्यावरील वाघोबा खिंडीतील वळणावर एक अवजड ट्रक टेम्पोवर उलटून झालेल्या अपघातात लहान मुलाचा मृत्यू झाला. या लहान मुलाच्या मृत्यूमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.