मुंबई – नवी मुंबईतील दिग्गज नेते भाजप आमदार गणेश नाईक आता चांगलेच अडचणीत येण्याची शक्यत आहे. लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असलेल्या महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली होती.
गणेश नाईक यांच्याबरोबर 1993पासून लिव्ह इन रिलेशनमध्ये संबंध असून आपल्याला एक वर्षांचा मुलगा देखील असल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. या मुलाचा स्वीकार करण्यास गणेश नाईक यांनी नकार दिला असून आम्हाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही या महिलेने केला आहे. आपल्या मुलाला नाईकांचे नाव मिळावे आणि संपत्तीत अधिकार मिळावा, अशी मागणी पिडित महिलेने केली आहे.
सीबीडीतील गणेश नाईक यांनी त्यांच्या कार्यालयात मार्च 2021 मध्ये आपल्यावर रिव्हॉलव्हर रोखले आणि ठार मारण्याची धमकी दिली होती, अशी तक्रार या महिलेने सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच महिलेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नवी मुंबई पोलिसांना पत्र लिहून स्वतःच्या आणि आपल्या मुलाला सुरक्षा पुरविण्याची विनंती केली आहे.
महिला आयोगाने घेतली दखल
याआधी पीडित महिलेने नेरूळ पोलीस ठाण्यात गणेश नाईक यांच्याविरोधात तक्रार दिली होती. मात्र, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यानंतर तिने महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची चौकशी करून पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच गणेश नाईक यांनी डीएनए चाचणी करावी आणि याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.