नवी दिल्ली – या वर्षाच्या शेवटच्या महिन्यापर्यंत गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. गुजरातमध्ये 11 मार्चपासूनच तयारी सुरु झाली होती, पण उत्तर प्रदेशच्या यशस्वी ‘पाॅलिटिकल ब्लू प्रिंट’वर तयार होत असलेल्या ‘मिशन गुजरात’चे हे मॉडेल सोमवारपासून म्हणजेच 18 एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन दिवसीय गुजरात दौऱ्यापासून होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते गुजरातमधील विविध भागातील लोकांशी संवाद साधतील, शिवाय संपूर्ण राज्यात 30हजार कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांची भेटही ते जनतेला देणार आहेत. भारतीय जनता पक्षाची निवडणूक रणनीती हाताळणाऱ्या एका प्रमुख नेत्याचे म्हणणे आहे की, उत्तर प्रदेशची निवडणूक रणनीती ज्याप्रमाणे तयार केली होती. त्याच धर्तीवर गुजरातची तयारी सुरु आहे. उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणूकीच्या 6 महिन्यांपूर्वी राजकीय वातावरण तयार करण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे गुजरातमध्येही तयारी सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा हे देशातील पाच वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून गुजरातमध्ये निवडणुकीची तयारी करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 मार्चला यूपीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 मार्चलाच गुजरातमध्ये पोहोचले, तर अलीकडच्या काही दिवसांत गृहमंत्री अमित शहा हेही गुजरातच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात भेटी देत आहेत.
निवडणूक रणनीती टीमच्या एका महत्त्वाच्या सदस्याने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यात लाखो लोकांशी संवाद साधतील. याशिवाय ते गुजरातमधील शेतकरी आणि महिलांशी संवाद साधणार आहेत. गुजरात भाजपशी संबंधित एका नेत्याचे म्हणणे आहे की, पंतप्रधानांच्या कार्यक्रमांपूर्वी सर्व तयारी करण्यात आली आहे. योजनेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील बनासकांठा येथील महिला दूध उत्पादकांना भेटणार आहेत. राज्यभरातील विविध जिल्ह्यातील तीन लाखांहून अधिक महिला या कार्यक्रमात सहभागी होणार असून, याशिवाय पंतप्रधान कृषी उत्पादनांबाबत मोठा जनसंवादही करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या गुजरात दौऱ्यात गुजरातमधील दाहोद या आदिवासी भागात आयोजित आदिवासी संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी लाखोंच्या संख्येने लोक पोहोचण्याची अपेक्षा आहे. या कार्यक्रमांव्यतिरिक्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील जामनगर येथे जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने बांधल्या जाणाऱ्या ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिनची पायाभरणी करतील. या कार्यक्रमात मॉरिशसच्या पंतप्रधानांसह जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुखही उपस्थित राहणार आहेत. गुजरात भारतीय जनता पक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यापूर्वी 18 एप्रिल रोजी गांधीनगरमधील कमांड अँड कंट्रोल सेंटरला भेट देणार आहेत.
येत्या काही दिवसांत मोदींचा गुजरात दौरा वाढवणार –
11 मार्चनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दुसरा गुजरात दौरा आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान पुढील काही महिन्यांत गुजरातचे दौरे वाढवणार आहेत. योजनेनुसार, पहिल्या काही महिन्यांत, ते जवळजवळ प्रत्येक महिन्यात गुजरातला जातील, त्या दरम्यान ते केंद्र आणि राज्याच्या सर्व प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. नियोजनानुसार, निवडणुका जसजशा जवळ येतील, त्याच पद्धतीने पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील नेते आणि मंत्र्यांच्या भेटी वाढतील.