रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे भूमिपूजनप्रसंगी प्रतिपादन
फलटण – फलटण लायन्स क्लबने फरांदवाडी परिसरात लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प करून आमच्या पणजोबांची स्मृती कायम ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत आम्ही तिघेही भाऊ कृतज्ञ आहोत. या हॉस्पिटलच्या उभारणीस सर्व सहकार्य करू, अशी ग्वाही बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटण लायन्स व लायनेस क्लबच्या माध्यामातून शहरानजीक फरांदवाडी येथे दहा गुंठे क्षेत्रात 61 लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. गोपालन संस्थेचे सचिव अरविंद मेहता अध्यक्षस्थानी होते. लायन्स डिस्ट्रिक्ट 3234 डी वनचे उपप्रांतपाल प्रा. रवींद्र देशपांडे (गडहिंग्लज), लायन्स क्लब व अन्य संस्थांचे पदाधिकारी, डॉक्टर, फरांदवाडीचे सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.
रघुनाथराजे म्हणाले, लायन्स क्लबच्या सदस्यांनी नगरपालिका व बाजार समिती अशा संस्थांमध्ये निवडून येऊन सेवाभाव जपल्यास या संस्था खऱ्या अर्थाने समाजाला न्याय देतील. नेत्र रुग्णालयाच्या उभारणीत विधान परिषदेचे सभापती रामराजे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे व माझे सहकार्य राहील. शहरात सर्व सुविधांनी युक्त रुग्णालय उभारण्यासाठी आम्ही बाजार समिती व साखर कारखाना परिसरात प्रयत्न केले; पण तत्कालीन विरोधकांनी त्यात खोडा घातला. तथापि शंभर खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारण्याचा आम्हा भावंडांचा मानस आहे.
या हॉस्पिटलसाठी दहा गुंठे जागा बक्षीसपत्राने देणारे जगदीश करवा यांचा रघुनाथराजे व रवींद्र देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लायन्स क्लबने नेत्रतज्ज्ञ डॉ. एम. सी. मोदी यांच्या काळात 15 शिबिरे घेऊन 23 हजार 800 रुग्णांची तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्याचे सचिव रणजित निंबाळकर यांनी सांगितले. लायन्स क्लबने गेल्या 50 वर्षात शहरी व ग्रामीण भागात राबविलेल्या उपक्रमांचा मी साक्षीदार आहे. हे कार्य अन्य सेवाभावी संस्थांसाठी प्रेरक असल्याचे मेहता म्हणाले. सचिव योगेश प्रभुणे यांनी आभार मानले.