‘लेन कटिंग’ करणाऱ्यांना पोलिसी दणका

जानेवारी ते ऑगस्टदरम्यान खंडाळा, वडगाव विभागाकडून कारवाई

पुणे – महामार्ग पोलिसांकडून वारंवार “लेन कटिंग’ करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येते. यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये खंडाळा आणि वडगाव विभागाकडून बेशिस्तांवर कारवाई करण्यात आली. कारवाईचे प्रमाण वाढले असतानाही वाहनचालक सर्रास “लेन कटिंग’च्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे चित्र संपूर्ण द्रुतगती मार्गावर आहे.

“पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस वे’वर वाहनचालकांनी नियमांचे पालन न केल्याने अपघातांची शक्‍यता वाढते. वाहनचालकांकडून प्रामुख्याने “लेन कटिंग’चे नियम धाब्यावर बसवण्यात येतात. या बेशिस्त वाहनचालकांना आणि अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी “लेन कटिंग’ करणाऱ्या वाहनचालकांवर आणि चुकीच्या बाजुने ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे शस्त्र हाती घेतले. मात्र, वाहनचालकांकडून हे प्रकार थांबत नसून वाढतच चालले असल्याचे समोर येते. महामार्ग पोलिसांनी 1 सप्टेंबरपासून सुमारे 7 हजारपेक्षा अधिक केसेस दाखल केल्या आहेत.

रविवारी सोमाटणे गावाच्या हद्दीत झालेल्या अपघाताबाबत महामार्ग पोलिसांकडून चुकीच्या दिशेने “ओव्हरटेक’ केल्याचा प्राथमिक निष्कर्ष व्यक्‍त केला आहे. त्यामुळे वाहनचालकांविरोधात पोलिसांनी कारवाई तीव्र केली असली तरी “लेन कटिंग’ आणि “ओव्हरटेकींग’च्या नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.

“आयटीएमएस’ यंत्रणा होणार कार्यान्वित
द्रुतगती मार्गावर होणाऱ्या बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी “इंटेलिजंट ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) बसवण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून, याबाबतच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या यंत्रणेमुळे “एक्‍स्प्रेस वे’चा 94 किलोमीटरचा टप्पा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली येणार आहे. “आयटीएमएस’मुळे नियम पालन न करता वाहन चालवल्यास थेट चालकावर कारवाई होणार असून, तातडीने दंड आकारण्यात येणार आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनचालकांनी नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे. वाहनचालकांनी लेन कटिंग करू नये. तसेच “ओव्हरटेक’ करणे टाळावे.
– मिलिंद मोहिते, पोलीस अधीक्षक (महामार्ग)

Leave A Reply

Your email address will not be published.