फोर्ट लॉडरडेल :– मैदानावर झालेली प्रचंड आतषबाजी सोबत मैदानावरील चाहत्यांचा “मेस्सी…मेस्सी’ असा जल्लोष, अशा उत्साहपूर्ण वातावरणात जगातील अव्वल फुटबॉलपटूंपैकी एक असणाऱ्या लिओनेल मेस्सीच्या आठव्या बॅलोन डी’ओर ट्रॉफीचे इंटरमियामी चाहत्यांकडून स्वागत करण्यात आले. अर्थात निमित्त होते, इंटर मियामी व न्यूयॉर्क सिटी एफसी यांच्यातील मैत्रीपूर्ण सामन्याचे. विशेष म्हणजे इंटरमियामीने हा सामना 2-1 अशा फरकाने गमावला असला तरी तो मेस्सीच्या बॅलोन डी’ओर ट्रॉफीच्या आनंदापुढे तोकडा ठरला.
‘बॅलोन डी’ओर’चा इतिहास
*जगातील सर्वोत्कृष्ट पुरुष व महिला फुटबॉलपटूच यासाठी पात्र असतात
*1956 पासून पुरुषांना सर्वोत्तम कामगिरीबद्दल तो दिला जातो
*2018 पासून सर्वोकृष्ट महिला खेळाडूंना पुरस्कार
*2020 मध्ये कोविड महामारीमुळे हा पुरस्कार देता आला नव्हता
सामन्यातील पराभवानंतरही मेस्सीने फ्लोरिडामध्ये त्याचे आणि त्याच्या कुटुंबीयांचे स्वागत केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. येथील “डीआरव्ही पीएनके’ स्टेडियमचा परिसर चाहत्यांच्या मेस्सी! मेस्सी! या घोषणांनी दुमदुमला होता. जुलैमध्ये इंटर मियामीमध्ये सामील झालेल्या मेस्सीने ऑगस्टमध्ये संघाला लीग कप विजेतेपद मिळवून दिले. परंतु सीझनच्या शेवटी पायाच्या दुखापतीमुळे तो नसल्याने संघ एमएलएस करंडक प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकला नव्हता. मेस्सीने यापूर्वी 2009, 2010, 2011, 2012, 2015, 2019 आणि 2021 मध्ये बॅलोन डी’ओर पुरस्कार जिंकला आहे.
26 ऑगस्ट रोजी मियामीच्या एमएलएस नियमित हंगामात दुसऱ्या हाफमध्ये पर्यायी खेळाडू म्हणून पदार्पण करताना, मेस्सीने न्यूयॉर्क रेड बुल्स विरुद्ध इंटरच्या 2-0 विजयात एक गोल करताना संघाची 11 पराभवांची मालिका खंडित केली होती. त्यानंतर पायाच्या दुखापतीमुळे त्याला संघापासून बाजूला रहावे लागले. तरीसुद्धा, यूएस लीगमध्ये मेस्सीमुळे प्रचंड उत्साह आला आहे. त्यामुळे मियामी संघाची जर्सी, एमएलएस सीझन पास सदस्यता आणि तिकीट विक्रीमध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे.
मी येथे थोड्या काळासाठी आलो असलो तरीही माझ्या कुटुंबाला इतके भरभरून प्रेम दिल्याबद्दल मी मियामीच्या सर्व लोकांचे आभार मानू इच्छितो. आपला जल्लोष खरंच मला प्रेरणा देणारा होता. आपल्या प्रेमामुळे येथे खेळताना मला प्रत्येक क्षणी घरच्या मैदानावर खेळत असल्याची अनुभूती येत होती.
– लिओनेल मेस्सी, अर्जेटिनाचा फुटबॉलपटू
गेल्यावर्षी कतार मध्ये पार पडलेल्या फिफा विश्वकरंडकातील त्याच्या प्रेरणादायी कामगिरीमुळेच अर्जेंटिनाला विजेतेपदापर्यंत पोचविले होते. या स्पर्धेत त्याने सात गोल केले होते.