लंडन :– अर्जेन्टिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेस मेस्सी याने जागतिक फुटबॉल क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा ‘बॅलोन डीओर’ पुरस्कार तब्बल आठव्यांदा पटकावण्याची कामगिरी केली आहे. (Ballon d’Or 2023 : Lionel Messi wins best player award for record-extending eighth time) इंटर मियामी संघाचे मालक व प्रख्यात माजी फुटबॉलपटू डेव्हीड बेकहॅम यांच्या हस्ते मेस्सीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मेस्सीने यापूर्वी 2009, 2010, 2011, 2012, 2015, 2019 व 2021 साली हा पुरस्कार मिळवला होता.
हा पुरस्कार जागतिक फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. खेळाडूच्या वैयक्तीक कामगिरीवरून हा पुरस्कार निश्चित केला जातो. जागतिक फुटबॉल क्लब स्तरावरील लीगमधील कामगिरी व देशाकडून खेळताना केलेली कामगिरी हा या पुरस्काराचा मुळ निकष असतो व हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.
जगातील सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला फुटबॉलपटू या पुरस्कारासाठी पात्र ठरतात. 1956 सालापासून दरवर्षी पुरुषांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी या पुरस्काराने सन्मानित केले जात होते. त्यानंतर 2018 सालापासून सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉलपटूंनाही हा सन्मान देण्यास सुरुवात झाली.