पुणे – दहशतवादी संघटना ‘आयसिस’च्या पुणे मॉड्युलशी संबंधित आणखी एका आरोपीला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली. आरोपी विदेशी दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी सक्रिय असल्याचे आढळून आल्याने त्याला शुक्रवारी ठाण्यातील पडघा येथून अटक करण्यात आली.
शमील साकिब नाचन (रा. पडघा, ता. भिवंडी, जि. ठाणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण आणि स्फोट घडवून आणण्यासाठी घेतलेल्या चाचणीत सहभागी असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, “एनआयए’ने यापूर्वी झुल्फिकार अली बडोदावाला, मोहंमद इम्रान खान, मोहंमद युनूस साकी, सिमाब नसिरुद्दीन काझी आणि अब्दुल कादीर पठाण अशा पाच संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. इम्रान खान आणि मोहंमद युनूस साकी हे दोघे “सुफा’ दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत. एप्रिल 2022 मध्ये राजस्थानात एका कारमधून स्फोटके जप्त करण्यात आली होती. या प्रकरणात “एनआयए’ने या दोघांना फरार घोषित केले होते.