सिमला-पंजाबमधील कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्याप्रमाणेच त्या पक्षाचे हिमाचल प्रदेशमधील अनेक नेते स्वप्न पाहत आहेत. त्यांना सिद्धू यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री बनण्याची आकांक्षा आहे, अशी खिल्ली भाजपचे आमदार नरिंदर ठाकूर यांनी मंगळवारी उडवली.
भाजपची सत्ता असणाऱ्या हिमाचलात चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होईल. त्याचा संदर्भ देऊन ठाकूर यांनी विधानसभेत बोलताना हिमाचलमधील कॉंग्रेस नेत्यांना शाब्दिक चिमटे काढले. त्यासाठी त्यांनी पाच राज्यांमधील मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजांचा आधार घेतला. विधानसभा निवडणुकांना सामोऱ्या गेलेल्या पाचपैकी कुठल्याच राज्यात कॉंग्रेसला सत्ता मिळण्याची चिन्हे नाहीत.
सिद्धू यांचे स्वप्न प्रत्यक्षात येणार नाही. चरणजितसिंग चन्नीही पुन्हा मुख्यमंत्री बनणार नाहीत. हिमाचलमधील कॉंग्रेस नेत्यांबाबतही तसेच घडेल, असे भाकीत ठाकूर यांनी केले. काही महिन्यांपूर्वी हिमाचलमधील पोटनिवडणुकांत कॉंग्रेसची सरशी झाली. त्यामुळे प्रदेश कॉंग्रेसचा उत्साह वाढला आहे. ठाकूर यांच्या शाब्दिक टोलेबाजीला ती पार्श्वभूमी आहे.