मास्को – रशियन तेलावरील बंदीमुळे जागतिक बाजारपेठेवर गंभीर परिणाम होतील. तेलाची किंमत प्रति बॅरल 300 च्या पार जाऊ शकते, असा इशारा रशियन उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक यांनी दिला आहे.
तसेच या किमती वाढल्यास त्या कमी होण्यास एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागेल आणि युरोपियन ग्राहकांना ते महागात पडेल. त्यामुळे युरोपियन राजकारण्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. कारण गॅस स्टेशन, विजेच्या आणि हीटिंगच्या किमती गगनाला भिडतील, असे ते म्हणाले.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी रशियाच्या तेल निर्यातीवर सरसकट बंदीविषयी गंभीर विचार करत असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर नोव्हाक यांनी दरवाढीचा इशारा दिला आहे.
भारताची तेलाची गरज भागवण्यासाठी जवळपास 84 टक्के खनिज तेल आपण आयात करतो. देशांतर्गत पेट्रोल-डिझेल आणि स्वयंपाक इंधनाच्या किमती आंतरराष्ट्रीय खनिज तेलाच्या भावाशी निगडित असतात. तेलाचे भाव डिसेंबरपासून वाढत आहेत, पण उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका येऊ घातल्यामुळे जवळपास चार महिने पेट्रोल-डिझेल दरवाढ रोखून धरण्यात आली होती. आता निवडणुका संपल्यामुळे ती कोणत्याही क्षणी होऊ शकेल, असा अंदाज आहे.
केंद्र सरकार किंवा राज्य सरकार सध्याच्या परिस्थितीत या इंधनांवर विविध कर वा शुल्क कमी करण्याची शक्यता नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दरांशी सुसंगत अशी जवळपास 15 ते 16 रुपये प्रतिलिटर दरवाढ होईल असा अंदाज आहे. तेल आयात करावे असतानाच, रुपयाही प्रतिडॉलर 77 पर्यंत घसरला हे लक्षात घ्यावे लागेल. चार महिन्यापूर्वी खनिज तेलाची किंमत प्रतिबॅरल 81.5 डॉलर होती. ती 1 मार्च रोजी 111 डॉलर प्रतिबॅरलवर होती. त्यामुळे इंधन दरवाढ अपरिहार्य दिसते.