मुंबई – मी ज्या घरामध्ये जन्माला आले, त्या घराचा स्थायीभाव हा संगीत होता; आहेही! संगीत हे सतत वाहणाऱ्या नदीसारखे असून ते कधीही संपत नाही. मनाला शांती देण्यामध्ये सर्वात अग्रेसर काय असेल, तर ते संगीतच आहे, अशा शब्दांत ख्यातनाम पार्श्वगायिका आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या मखमली आणि वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने सात दशकांहून अधिक काळ गाजवलेल्या सर्वांच्या लाडक्या आशा भोसले आज नव्वदीत प्रवेश करत आहेत. त्यानिमित्त वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.
आशा भोसले या सर्व काळ आणि वयोगटांमध्ये एक लोकप्रिय पार्श्वगायिका म्हणून नावारुपाला आल्या आहेत. सुमारे आठ दशकांपूर्वी पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर हिंदी-मराठीसह अन्य 14 भारतीय भाषांमध्ये गायन केलेल्या आशा भोसलेंच्या सदाबहार आणि तरुण आवाजाची मोहिनी अनेक पिढ्यांवर आहे. सात वेळा फिल्म फेअर पुरस्कारासह पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषणसह शेकडो पुरस्कारांवर आपले नाव कोरलेला हा आवाज आजही ताजा वाटतो.
नव्वदीमध्ये पदार्पण करतानाही आणि सुमारे 12,000 गाण्यांच्या कामगिरीनंतर, आशा भोसले पुन्हा रंगमंचावर येण्याच्या तयारीत आहेत, हे विशेष. आपल्या मुलाखतीत त्या पुढे म्हणाल्या की, संगीत हे श्वास घेण्यासारखे आहे. हे नेहमीच सोपे नसते. संगीत आमच्या आयुष्यात नसते, तर आम्ही जगूच शकलो नसतो, असे सांगून आशा भोसले म्हणाल्या की, मी संगीताला खूप काही दिले आहे, असे म्हणण्यापेक्षा संगीताने मला खूप काही दिले; नव्हे जगवले आहे. माझ्या आयुष्यात अनेक कठिण प्रसंग आले. पण त्या प्रत्येक प्रसंगातून तरुन जाण्याचे सामर्थ्य संगीतानेच दिले आहे.
मीना कुमारीपासून ते काजोलपर्यंत असंख्य नायिकांना आपला अवाज देणाऱ्या आशा भोसले यांनी मराठी-हिंदीसह विविध भाषांतील जवळपास सर्वच संगीतकारांकडे गाणी रेकॉर्ड केली. “पिया तू अब तो आजा” आणि “ओ हसीना जुल्फों वाली” सारख्या आकर्षक गाण्यांपासून ते “दिल चीज क्या है” आणि शास्त्रीय “तोरा मन दर्पण कहलाये” सारख्या भावपूर्ण गझलांपर्यंत, भोसले हा लाखो भारतीयांचा आवाज आहे. गुलाम अलींसमवेत त्यांनी केलेला अल्बम “मिराज़-ए-ग़जल’ आजही अनेकांना आठवत असेल.
तसेच एमटीव्ही ऍवॉर्ड मिळवणारी आशा भोसले ही भारतीय गायिका ठरली होती. द ब्लॅक आयड पीझने त्यांच्या काही गाण्यांचे संगीत वापरले. त्यांनी बॉय जॉर्ज आणि स्टीफन लॉसकॉम्बे तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ब्रेट ली यांच्यासोबत काम केले. जुन्या आठवणींना उजाळा देताना आशाताई सांगतात की,मी मुख्य कलाकारांसाठी आणि नर्तकींसाठीही गाणी गायली आहेत. मला विश्वास आहे की, माझा आवाज कोणालाही चांगला सुट होऊ शकतो. पण मला आणखी शास्त्रीय गायन करता आले असते, तर तो अनुभवही घ्यायचा होता.