पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात शुक्रवारी (दि. 1) सकाळी हलका पाऊस झाला. त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते. मध्यवर्ती भागांत शिवाजीनगर, सदाशिव पेठ यांसह हडपसर, मुंढवा, कोथरूड, पाषाण, औंध, नऱ्हे, कात्रज परिसरात रिमझिम झाली. दरम्यान, पुढील 24 तास शहरातील हवामान ढगाळ तर मेघगर्जनेसह हलक्या सरी पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
शहर-जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. पण, शुक्रवारी सकाळी झालेल्या पावसाने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे.
राज्यातील हवामान बदलाचा परिणामामुळे येत्या 48 तासांत कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना, सोसायट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. धुळे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, जालना या जिल्ह्यात गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शहरातील कोरेगाव पार्क येथे 1.5, एनडीए आणि पाषाण परिसरात 0.5, शिवाजीनगर भागात 0.2 मि.मी. पावसाची नोंद झाली. तर अन्य भागात किरकोळ सरी पडल्या.
शहरासह जिल्ह्यातील मागील 24 तासांतील किमान तापमान
हवेली 18.3, बारामती 18.6, माळीण 18.7, नारायणगाव 18.8, आंबेगाव 19.1, दौंड 20, एनडीए 20.4, शिवाजीनगर 20.9, राजगुरूनगर 21.2, पाषाण 21.3, इंदापूर 22.1, कोरेगाव पार्क 22.3, मगरपट्टा 23.6, हडपसर 23.9, चिंचवड 24.6 आणि वडगावशेरी 24.9.