Life With Corona : भाजी, किराणा नेताना घ्या काळजी

अन्नधान्य, किराणा, भाजीपाला, फळे या तर दैनंदिन गरजाच आहेत. मात्र, त्याचवेळी मार्केट यार्डातील व्यापारी, मेडिकल दुकानातील कर्मचारी, भाजी, फळ विक्रते यांना करोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नागरिकांना स्वत:ची काळजी स्वत:लाच घ्यावी लागणार आहे. विशेषत: खरेदी करून बाहेरून आणलेले साहित्य घरात घेताना सावधानता बाळगावी लागणार आहे.

शेतकरी माल तोडणी करतो. त्यानंतर वाहनांतून तो मार्केटला येतो. तेथे गाळ्यावर मालाची विक्री होते. हमाल हा माल उतरवतात. मापाडींच्या उपस्थितीत त्यांचे वजन होते. तेथून किरकोळ व्यापारी माल खरेदी करतात आणि स्टॉल, दुकानांच्या माध्यमातून त्याची विक्री करत असतात. तेथून ग्राहक खरेदी करून माल घरी घेऊन येतो.

या सर्व प्रक्रियेतीला एका व्यक्तीला जरी करोनाचा संसर्ग असेल, तर परिणाम होण्याची शक्‍यता असते. बाहेरून घेऊन आलेल्या मालाबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.

भाजी, किराणा दुकानात खरेदीसाठी गेल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले पाहिजे. घरातून सॅनिटाइज होऊन निघा. खरेदी करून आल्यानंतर संपूर्ण कपडे गरम पाण्यात धुवून स्वत: सॅनिटाइज होणे आवश्‍यक आहे. भाज्या, फळे गरम पाण्यात धुवून घ्या. मात्र, त्या वस्तू गरम पाण्यात ठेवू नये. ठेवल्यास त्याचा वेगळा परिणाम होण्याची शक्‍यता असते. किरणा माल काही काळ बाहेर ठेवून घरात घ्यावा. बाजारात आर्थिक व्यवहार करताना हातमोजे, हॅंडग्लोव्हज वापरावेत. त्यानंतर आंघोळ केली पाहिजे. आंघोळ शक्‍य नसेल तर किमान गरम पाण्याने हातपाय, चेहरा धुतला पाहिजे. साधा घरगुती आहार, कडधान्याचा वापर असेल तर चांगलेच. यातून करोनाचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो.
– डॉ. भारत कदम, कार्यकारिणी सदस्य, पुणे डॉक्‍टर्स असोसिएशन

Leave A Reply

Your email address will not be published.