Life With Corona : खरिपातील अन्नसाखळी धोक्यात

– तुषार रंधावे 

करोना आणि लॉकडाऊनमुळे खरिपासाठी आवश्‍यक असलेल्या रासायनिक खतांच्या उत्पादक कंपन्यांचा कच्चा माल बंदरांमध्ये अडकून राहिल्याने, या कंपन्यांचे पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू झालेले नाही. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील कृषी क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेत, कृषी विभागाने शेतीविषयक कामांना परवाने देण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, मनुष्यबळाची कमतरता आणि वाहतूक समस्या लक्षात घेता, यंदाचा खरीप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्‍यता कमी आहे.

लॉकडाऊनमुळे राज्य-परराज्यातील कामगारांनी घराची वाट धरल्याने शेतीला मनुष्यबळाची कमतरता भासणार आहे. तर यंदा सरासरीइतका पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असला, तरीदेखील पेरणीचे नियोजन कसे करावे, या विवंचनेत शेकरीवर्ग आहे. शेतमालाची वाहतूक सुरू झाली असली तरीदेखील लाखो टन शेतीमाल शेतातच पडून आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळीत भिजल्याने या शेतमालाची किंमत शून्य झाली आहे.

खरिपात शेतकऱ्यांना 40 लाख टन खते वाटायची आहेत. त्यासाठी वाहतूक व मनुष्यबळाची नितांत गरज आहे. विविध पिकांकरिता 16 लाख क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करायचा आहे. हे शिवधनुष्य पेलायची कसरत आता कृषी विभागाला करायची आहे. लॉकडाऊन कालावधीत राज्यात शेती व्यवस्थेतील अत्यावश्‍यक सेवांना सूट दिलेली असतानाही काही जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून सतत दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे खरिपात खते, बियाण्यांची स्थिती गंभीर होऊन शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो, ही बाब कृषी विभागाने राज्य शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करत उपाययोजना राबविण्याची सूचना केली आहे.

लॉकडाऊननंतर कृषी क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या
– मनुष्यबळाची कमतरता
– मजुरीत वाढ होण्याची दाट शक्‍यता
– खते व बि-बियाणांची कमतरता जाणवणार
– काही ठरावीक जिल्हे वगळता अन्य ठिकाणी शेतकऱ्यांना बांधावर बियाणे मिळण्याची शक्‍यता धुसर
– वाहतूक यंत्रणेअभावी शेतमाल पडून राहण्याची शक्‍यता
– अवकाळीचे घोंघावते संकट

लॉकडाऊनमधून शेती व शेतीविषयक सेवांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे खरिपासाठी आवश्‍यक असलेली बि-बियाणे व खतांच्या वाटपावर आमचे लक्ष आहे. हवामान खात्याने यंदा सरासरीइतका पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे. खरीप पेरणीकरिता शेतकऱ्यांना आवश्‍यक असलेल्या सुविधा पुरविण्यावर कृषी विभागाचा भर असणार आहे. लॉकडाऊनचा खरीप हंगामावर फारसा परिणाम जाणवणार नाही.
– सुहास दिवसे, कृषी आयुक्‍त


पाच एकरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतीमध्ये कुटुंबातील सदस्यांची शेतीविषयक कामांसाठी मदत घेतली जात आहे. मात्र, अधिक क्षेत्र असलेल्या शेतीच्या कामांकरिता प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता जाणवायला काही प्रमणात सुरुवात झाली आहे. अनेक कामगार गावी निघून गेले आहेत. त्यामुळे शेतीबरोबरच शेतीपूरक उद्योगालाही कामगारांची कमतरता जाणवणार आहे, पण मुख्यत: शेतीला लागणाऱ्या मजुरांची अडचण होणार आहे. अद्याप आपल्याकडील शेतीकामात मजुरांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. यांत्रिकीकरणाचा पर्याय विचारात घ्यायला हवा.
– राजू थोरवे, शेतकरी

Leave A Reply

Your email address will not be published.