पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शिवाजीनगर भागातील वडारवाडी परिसरात टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी व्यंकटेश उर्फ वैंक्या साठे (रा. पठाणवस्ती, जुनी वडारवाडी), रियाज शेख (रा. बसवेश्वर मठाजवळ, जुनी वडारवाडी) यांच्यासह चार ते पाचजणांविरुद्ध गु्न्हा दाखल केला.
याबाबत सनी अर्जुन कुहाडकर (वय ३४, रा. विटकर बंगल्यासमोर, जुनी वडारवाडी) याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास साठे, शेख यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी या परिसरात धमकी देऊन कोयते उगारले. परिसरात लावलेल्या दुचाकींची तोडफोड करुन आरोपी पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक केकाण तपास करत आहेत.
कोंढवे धावडे येथे टोळक्याची मारहाण
पुणे, दि. २७ – एनडीए रस्त्यावरील कोंढवे धावडे परिसरात सोमवारी रंग लावण्याच्या कारणावरुन टोळक्याने तिघांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश डागोर, शिवम मोकाशी, संकेश्वर मलखेडकर, साईनाथ पाटील, जाॅय, अमीर ज्यूसवाला, साहिल वंजारी, सूरज यादव, शुभम यादव, रोहित तिकिटे यांच्या १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत श्रीयश कडाव (वय २४, रा. भैरवनाथनगर) याने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. श्रीयश त्याचे मित्र अनिकेत देवीकर, संग्राम मोरे, प्रणित चोरगे यांच्यात रंग खेळण्यावरुन वाद झाला. आरोपींनी चौघांना बांबू, तसेच फावड्याने मारहाण केली. पाेलीस उपनिरीक्षक कुरेवाड तपास करत आहेत.