मंचर -पोंदेवाडी फाटा (ता. आंबेगाव) येथे पारगांव-शिरुर रस्त्यावर हातभट्टीची दारू आणि दारू वाहतुकीसाठी असणारा पिकअप टेम्पो मंचर पोलिसांनी जप्त केला आहे, 2 लाख 19 हजार रुपये किमतीच्या मालाचा पंचनामा पोलिसांनी केला आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंचर पोलीस गस्त करीत असताना पोंदेवाडी फाटा येथे शिरूरकडून पारगांवकडे वाहनचालक गणेश रुपाजी मुंजाळ (रा. कवठे येमाई, ता. शिरुर) हा शनिवार (दि. 18) पहाटे पिकअप गाडी (एमएच 16 एवाय 5531) घेऊन जात होता. पिकअपच्या दर्शनी भागात भाजीपाला, कांदे वाहतुकीसाठी परवानगी असल्याचे पत्रक चिटकवले होते.
पोलिसांना संशय आल्याने पिकअप गाडी थांबवून वाहनचालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी पिकअपच्या मागील हौदात पाहणी केली असता प्रथम भाजीपाल्याचे कॅरेट आणि त्याच्या आतीस बाजूस 4 प्लॅस्टिकचे कॅन आणि एक रबरी टायर ट्युब आढळली.
वाहनचालकास याबाबत विचारले असता त्याने ही हातभट्टी दारू स्वतः तयार करून मांजरवाडी येथे विक्री करण्यास चालला असल्याचे कबुल केले. मंचर पोलिसांनी 17 हजार 500 रुपयांचा बेकायदा दारूसाठा, पिकअप गाडी आणि 1 हजार 500 रुपये रोख रक्कम ताब्यात घेतले आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड, पोलीस उपनिरीक्षक सी.जी.वाघ, सागर गायकवाड, कृष्णा पाबळे, सुधाकर माताडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.