मुंबई – लियाम लिव्हिंगस्टोन व राहुल चहर यांनी केलेल्या वादळी फलंदाजीमुळे पंजाब किंग्जने गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी 190 धावा करण्याचे आव्हान उभे केले.
गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर कर्णधार मयंक आग्रवाल पुन्हा एकदा अपयशी ठरला. तसेच जॉनी बेअरस्टोने देखील निराशा केली. अनुभवी शिखर धवन चांगला खेळत असताना अनावश्यक फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्याने 30 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 35 धावा केल्या.
त्यानंतर मात्र, लिव्हिंगस्टोनने जितेश शर्माच्या साथीत तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली व डाव सावरण्याचा प्रयत्न केला. शर्माही 23 धावांवर परतला. त्यानंतर भरात असलेल्या ओडेन स्मिथनेही निराशा केली. दरम्यान, लिव्हिंस्टोनने आपले वर्चस्व सिद्ध करत दमदार अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो 64 धावांवर बाद झाला. मात्र, त्याने केवळ 27 चेंडूत 7 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली. त्यानंतर शाहरुख खान 15, कागिसो रबाडा 1 व वैभव अरोरा 2 धावा काढून बाद झाले.
तळात फलंदाजीला आलेल्या राहुल चहरने मात्र गुजरातच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला व 14 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावताना नाबाद 22 धावांची खेळी करत पंजाबला 20 षटकांत 9 बाद 189 अशी भक्कम मजल मारून दिली. त्याला अर्शदीप सिंगने नाबाद 10 धावा करत सुरेख साथ दिली. गुजरातकडून रशीद खानने 3 गडी बाद केले. दर्शन नाळकंदेने 2 बळी घेतले. महंमद शमी, लॉकी फर्ग्युसन व हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक –
पंजाब किंग्ज – 20 षटकांत 9 बाद 189 धावा. (लियाम लिव्हिंगस्टोन 64, शिखऱ धवन 35, राहुल चहर नाबाद 22, अर्शदीप सिंग नाबाद 10, रशीद खान 3-22, दर्शन नाळकंदे 2-37).