मुंबई – रशिया- युक्रेन युद्धामुळे सध्या रुपयाचे मूल्य कमालीचे अस्थिर आहे. रुपयाच्या मूल्यात शुक्रवारी काही प्रमाणात सुधारणा झाली. रुपयाचे मूल्य 13 पैशांनी वाढून 75.90 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेले होते.
काल रुपयाच्या मूल्यात 19 पैशांची घट झाली होती. रिझर्व बॅंकेने आज व्याजदरात वाढ न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढले. या घडामोडींमळे रुपयाला काही प्रमाणात आधार मिळण्यास मदत झाली. भारताची चालू खात्यावरील तूट वाढत आहे. त्याचबरोबर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतातून गुंतवणूक काढून घेत असल्यामुळे रुपयाच्या मूल्यावर सध्या दबाव येत आहे.
काल परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 5,009 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. मात्र भारताकडे तब्बल 630 अब्ज डॉलरचे परकीय चलन असल्यामुळे नजिकच्या काळामध्ये भारतासमोर परकीय चलनाचा मोठा प्रश्न निर्माण होणार नसल्याचे समजले जाते.