पुणे – मागील दोन महिने शहरातील मध्य भागातील सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठेसह लक्ष्मी रस्त्यालगतच्या गल्ल्यांमधील बांबूचे अडथळे शुक्रवारी सायंकाळनंतर हटवण्यात आले. मात्र, पूर्व भागातील पेठांमधील प्रतिबंधित(कंटेनमेंट झोन) परिसराकडे जाणारे रस्ते बंदच ठेवण्यात आले आहेत.
मध्य भागातील सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठेतून लक्ष्मी रस्त्याला जोडणारे सर्व रस्ते मागील दोन महिने बंद ठेवण्यात आले होते. बाजीराव रस्त्यालगतच्या छोट्या गल्ल्या बांबूचे अडथळे टाकून बंद करण्यात आल्या होत्या. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी प्रतिबंधित भाग वगळता शहरातील अन्य भागांतील दुकाने उघडण्याची परवानगी दिली.
त्यानंतर बुधवारी सकाळी लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कर्वे रस्ता, कुमठेकर रस्त्यासह उपनगरातील बहुतांश दुकाने उघडण्यात आली. दरम्यान, लक्ष्मी रस्त्यावर असलेले अडथळ्यांमुळे या भागात पोहोचण्यास व्यावसायिक आणि कामगारांना त्रास होता. त्यामुळे तेथील अडथळे काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती.
शुक्रवारी सायंकाळनंतर लक्ष्मी रस्ता तसेच लगतच्या उपरस्त्यांवरील बांबूचे अडथळे हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, रमणबाग प्रशाला, लोखंडे तालीम तसेच परिसरातील अडथळे हटविण्यात आले. प्रतिबंधित भागातील रस्ते पत्रे लावून बंद करण्यात आले आहेत. या भागाकडे जाणारे रस्ते बंदच आहेत.
प्रतिबंधित भागातील पत्रे उचकटून नागरिकांची येजा
प्रतिबंधित भाग पत्रे लावून बंद करण्यात आला आहे. येथील करोणाची लागण इतर परिसरात पसरु नये म्हणून हा उपाय करण्यात आला आहे. प्रतिबंधित क्षेत्रात दुपारी दोन पर्यंत किराणा व मेडिकल उघडी ठेवण्यात आली आहेत. तर भाजीपाला आणी दुध महापालिका आणी पोलिसांच्या समन्वयातून पुरवठा करण्यात येत आहे.
यामुळे प्रतिबंधित भागातील नागरिकांना आतल्या आत शक्य तेवढ्या सुविधा पुरविण्यात येत आहे. असे असतानाही काही नागरिक खरेदी व इतर कारणांसाठी लावलेले पत्रे उचकटून येजा करत आहेत. यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातील करोणाची लागण इतरही क्षेत्रात पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. पत्रे लावलेल्या ठिकाणी महापालिका कर्मचारी किंवा पोलिसांची उपस्थिती असणे आवश्यक आहे. अन्यथा उपाय योजनांचा काहीच उपयोग होणार नाही.