पुढे पुढे चालावे…

सरळसोट आयुष्य कुणाच्याच वाट्याला येत नाही. त्यात चढउतार येतातच. कधी कधी त्यातल्या कटू आठवणी इतक्‍या तीव्र असतात की त्यांची पडछाया पुढच्या वाटचालीवर पडते. मिळालेला एखादा धोका, कुणी जीवलगाने केलेली फसवणूक, मनावर किंवा शरीरावर झालेला आघात यातून बाहेर पडणं सोपं नाही, पण तेच कुरवाळून बसणंही जीवन नाही. जीवनाचा प्रवास पुढे पुढे जाण्यासाठी असतो. त्यात मागे वळून क्षणभर पाहायचं पण त्याच्या ओझ्याखाली न राहता पुढचा मार्ग अवलंबायचा. स्त्रियांना या स्थित्यंतरांना फार नेटाने सामोरं जावं लागतं. तेव्हा त्यांच्या कटू आठवणीत कुढायचं की पुढच्या सुंदर आयुष्याला कुरवाळायचं ते तुम्हीच ठरवायला हवं..

नव्या फॅक्‍टरीचा शुभारंभ करताना वेदिका आनंदात होती. तिने सगळ्या आप्तमित्रांना बोलावून हा क्षण साजरा केला. तिच्या या उमेदीची खरं तर दाद द्यायला हवी. कारण दोनच वर्षांपूर्वी तिच्या आधीच्या फॅक्‍टरीला आग लागून सगळं भस्मसात झालं होतं. एवढंच नाही तर या आगीने तिच्या नवऱ्याचाही बळी घेतला होता, पण मनावरची ती मळभ दूर सारून ती मुलांसाठी पुन्हा उभी राहिली होती आणि त्याच जागेवर पुन्हा नव्याने कामाला लागली होती, पण सगळ्यांनाच तिचा हा निर्णय पटलेला नव्हता. त्यातल्या एका लांबच्या काकूंनी बोलून दाखवलंच,” याच अवलक्षणी जागेत कशाला पुन्हा काम सुरू करायचं. कपाळ पांढरं केलंच आहे आता मुलांचा तरी विचार नको का करायला?’ असं म्हणून त्यांनी तिच्या उत्साहावर पाणी टाकायचं काम केलं. पण वेदिका ठाम होती.” याच जागेवर काहीतरी भव्य करण्याचं स्वप्न मी आणि माझ्या नवऱ्याने पाहिलं होतं, तेव्हा मी इथूनच नवी सुरुवात करेन, मागचे कॉन्टॅक्‍ट वापरायलाही त्यामुळे मदत होईल ‘असा तिचा थोडा भावनिक आणि थोडा व्यवहारीक विचार होता. मागे काय झालं हे पाहण्यापेक्षा आता पुढे काय आहे ते पाहायला हवं होतं. त्यावरच वेदिका चालत होती. काकूंचं मत प्रातिनिधीक होतं.

समाजातल्या बहुतेकांना असं वाटत असतं की एकदा काहीतरी वाईट झालं की त्या जागेला किंवा त्या व्यक्तीत काहीतरी दोष आहे. त्याने ती क्रिया पुन्हा करू नये. त्या दु:खाची जाणीव सतत मनात ठेवावी. कोणी त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न केलाच तर तिला त्या प्रसंगांची, मानहानीची सतत आठवण करून देऊन ते तिचं खच्चीकरण करत असतात, पण वेदिकाने आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. अशा लोकांना कसं उत्तर द्यायचं हेही तिने ठरवलं होतं. ती म्हणाली, “मी तो प्रसंग माझ्या आयुष्यातून पुसून टाकलाय. एखादा माणूस ऍक्‍सिडेंट झाला म्हणून प्रवास करणं थांबवत नाही ना? मग मी का थांबू? आज मला पुन्हा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळतेय आणि मी ती नक्कीच सोडणार नाहीये!’ वेदिकाच्या या ठाम विधानाने आता गप्प बसण्याची वेळ काकूंवर आली.

वेदिकाच्या दृष्टीने घडलेला प्रसंग विसरणं आणि त्यातून बाहेर पडणं कठीणच होतं. बरेच दिवस ती कोणाशी बोलत नव्हती, पण याचवेळी तिचे कुटुंबीय पुढे आले, झाल्या प्रकारात तिचा काही दोष नव्हता हे त्यांनी तिला नीट पटवून दिलं. एकदा अपघात झाला म्हणजे त्याची शिक्षा सगळ्या आयुष्याला द्यायची नसते हे तिला समजावलं. ज्या वाटेवर तू अडखळली आहेस त्याच वाटेवर सन्मानाने चालण्याची ताकद मिळव, अशी उभारी दिली त्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचीही मदत घेतली. वेदिकालाही हे म्हणणं पटलं. आता पुढचा विचार करायला हवा होता. जाणारा निघून गेला पण आता मुलांचं भविष्य तिला घडवायचं होतं. म्हणूनच ती जास्त कणखरपणे उभं राहण्याचा प्रयत्न करत होती.
आयुष्य हा प्रवास मानला तर त्यात खाचखळगे आलेच, कधी अपघातही होतात पण म्हणून कोणी मधेच थांबून राहू शकत नाही. थांबलं तर आयुष्याचा अर्थच नाहीसा होतो. चारचौघांना करता आला तसा चांगला प्रवास करता यावा असं प्रत्येकाला वाटत असतं, पण कधी मोहाला बळी पडून शॉर्टकट घेतला की त्यातले खाचखळगेही सोसावे लागतात. कधी एखादा खड्डा अनावधानाने दिसत नाही आणि पाय त्यात पडतो, पण पडलेला पाय उचलून पुढे टाकणं यात खरं शहाणपण आहे. त्यासाठी लागते मनाची ताकद. ती महिलांकडे खरं तर खूप असते. दुसऱ्यांना सावरायला मदत करणाऱ्या बहुतेकवेळा स्त्रियाच असतात, मग त्यांच्यावर अशी वेळ आली तर त्यांनी खचून का जायचं?

बरेचदा स्त्रियांवर होणारे अन्याय न बोलण्यासारखे असतात, कारण त्यांची वाच्यता म्हणजे तिचीच बदनामी हे समीकरण ठरून गेलं आहे, पण आता या विचाराशीही दोन हात करण्याची गरज आहे. घरच्यांना विश्‍वसात घेऊन वेळीच त्याचा बंदोबस्त केला तर त्यातून मार्ग निघू शकतो. अनेक कायदे आणि सामाजिक संस्थाही या बाबतीत स्त्रियांच्या बाजूने काम करत आहेत. गरज आहे ती थोडं धाडस दाखवून अन्यायाला प्रतिकार करण्याची. पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट आहे ती हा सल मनात न ठेवता त्यातून बाहेर पडण्याची. जीवनातलं एखादं वळण नकोसं वाटलं तर वाट बदलण्याची. हा बदल मानसिकदृष्ट्या सहन करण्याची. याची सुरुवात हळूहळू होईल. आपल्या आयुष्याला एका छोट्याशा गोष्टीसाठी पणाला लावणं योग्य नाही हे त्यांनाही पटू लागलं आहे. “तो’ प्रसंग किंवा कटू आठवण विसरून जाऊन पुढे जायची तयारी त्यांनी दाखवायला हवी.

स्वाती वाळिंबे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here