अभिनेत्यांचे “अग्गं बाई…’

पुरुषाने स्त्री व्यक्‍तिरेखा साकारायच्या ही पद्धत आजची नाही तर महाराष्ट्रात तर संगीत नाटकांपासून सुरू असलेली ही परंपरा आहे. हल्ली मालिकांमध्ये, चित्रपटांमध्येही स्त्रीभूमिकेत बरेचदा स्त्री वेशातील कलाकार दिसू लागले आहेत. तद्दन व्यावसायिक मसाला चित्रपटांमध्ये अशा प्रकारे स्त्रीवेशातील कलाकार दाखवणे ही गोष्ट काही नवी नाही.”चला हवा येऊद्या’, कपिल शर्माचा शो यामध्ये पुरुष कलाकारांनी साकारलेल्या स्त्री भूमिकांना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आयुष्मान खुराना आपल्या नव्या “ड्रीमगर्ल’ चित्रपटात स्त्री वेषात दिसून आला. आयुष्मान या भूमिकेविषयी सांगतो की, ही भूमिका करायला मजा आली. कारण कथेतच या पात्राला वाव आहे. माझ्या मते, भविष्यातही मला अशा प्रकारची भूमिका करण्यास काहीच अडचण नाही. अट एकच, ती तर्कशुद्ध आणि कथेची गरज असावी.

अनेक असे चित्रपट आहेत ज्यामध्ये नायकांनी व्यक्‍तिरेखेची अथवा कथेची गरज म्हणून स्त्रीवेश धारण केला आहे. साजिद खानच्या “हमशकल’ मध्ये सैफ, रितेश आणि राम कपूर यांनी नटलेल्या, सजलेल्या युवतींचा वेश थोडा वेळासाठी धारण केला होता. “दिल बोले हडिप्पा’ चित्रपटात राणी मुखर्जीने पुरुष पात्र साकारले होते. तसे तर विरुद्ध लिंगी भूमिका साकारण्याचे कुतूहल अभिनेता आणि अभिनेत्री या दोघांनाही असतेच. अर्थात, अभिनेते यामध्ये जास्त नशीबवान आहेत. खूप कमी नायिकांना पडद्यावरती पुरुष वेशातील पात्रे जिवंत करण्याची संधी मिळाली. पण अभिनेत्यांना किंवा नायकांना स्त्रीवेश धारण करून चित्रपटातील नायकांबरोबर फ्लर्ट करताना दाखवले गेले. अभिनेता नसिरुद्दीन शाह म्हणतात की, अशा प्रकारची पात्रे एक विचित्र वातावरण तयार करतात. त्यामुळे प्रेक्षकांना मजा वाटत असली तरीही अभिनेत्यांना मात्र जोकर होऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करावे लागते. अर्थात, त्यापासून पळ काढावा किंवा ती टाळावीत असेही काही नाही. कारण अशी पात्रे अभिनयाचा एक भागच आहेत.

नसिरुद्दीन शहा यांच्या प्रतिक्रियेमुळे अनिल शर्मा यांचा “तहलका’ नावाचा चित्रपट डोळ्यासमोर येतो. त्यात जावेद जाफरी आणि आदित्य पांचोली यांनी स्त्री रूप घेऊन डांग या अमरिश पुरी यांनी साकारलेल्या खलनायकाच्या अड्ड्यावर खूप गोंधळ घातल्याचे दाखवण्यात आले होते. पण तरीही प्रेक्षकांच्या मनात ही पात्रे घर करू शकली नाहीत. “शोला और शबनम’,”आंटी नं 1′ या काही चित्रपटांमध्ये गोविंदानेही स्त्री भूमिका साकारल्या होत्या. तो म्हणतो की अशा प्रकारच्या भूमिका सहसा विनोदनिर्मितीसाठीच असतात. जेव्हा नायिकेला भेटण्यासाठी तिचे वडील किंवा नातेवाईक आडकाठी करतात तेव्हा नायकाला मैत्रीण किंवा मावशी, काकू होऊन भेटायला जावे लागते. नायिकेला अशी फारशी वेळ येत नाही. तिला अगदी क्‍वचित रूप पालटून यावे लागते. अशोककुमार, प्राण यांच्यापासून शाहरूख खान, अक्षयकुमार यांच्यापर्यंत सर्वांना स्त्री वेषात पात्र साकारावे लागले आहे.
आव्हानात्मक परिस्थिती ः “अपना सपना मनी मनी’ या चित्रपटातील अभिनेता रितेश देशमुख याने युवतीचे पात्र साकारले आहे. हा चित्रपट येण्यापूर्वी रितेशच्या त्या गेटअपची इतकी चर्चा झाली की चित्रपट आल्यानंतर प्रेक्षकांना त्यांची फसवणूक वाटली. अर्थात, स्त्री वेशातील रितेश देशमुखच्या अभिनयाची खूप चर्चा झाली, कौतुकही झाले. मात्र हा गेटअप त्याच्यासाठी विशिष्ट नव्हता. रितेश म्हणतो की, अशा भूमिका विशेष तेव्हाच होतात जेव्हा त्या चित्रपटाच्या कथेचाच एक अतूट भाग असतात. माझ्या मते, “अपना सपना मनी मनी’ किंवा “हमशकल’ मध्ये साकारलेल्या भूमिकांमध्ये काहीतरी कमतरता होती हे नक्‍की. जॉनी लिव्हर यांनी अनेक चित्रपटांमध्ये असा प्रकारच्या वेशभूषेतील पात्र साकारली आहेत. ते मात्र अशी पात्र एक आव्हान म्हणून पाहतात. जॉनी लिव्हर म्हणतात, मी काही उदाहरण देऊ इच्छित नाही; पण एक चांगला अभिनेता अशा प्रकारची स्त्री पात्रे लक्षात राहण्याजोगी साकारण्याची क्षमता बाळगतो.
कमल हसन किंवा आमीर खान हे दोघेही परफेक्‍शनिस्ट अभिनेते. त्यांच्याबाबत मात्र ही गोष्ट नक्‍कीच तार्किक वाटते. पडद्यावर काहीतरी नवीन साकारण्याची पद्धत ही अस्वस्थ करणारी किंवा नकोशी वाटत नाही. त्यामुळेच एका जाहिरातीत महिलेचे पात्र साकारणाऱ्या आमीर खानचे रूप प्रेक्षकांना भावले होते. खूप पूर्वी 1996 मध्ये आशुतोष गोवारीकरच्या “बाजी’ चित्रपटात आमीर खानने ज्युली या कॅबेरे नर्तकीची भूमिका साकारली होती आणि प्रेक्षकांना आकर्षितही केले होते. पण ही भूमिका त्या कथेतील लहानसा भाग होती. मी अशी स्त्री पात्रे साकारताना गेटअपविषयी सुरुवातीपासूनच गांभीर्याने लक्ष देत होतो. काहीतरी नवीन करायचे म्हणून एखादा गेटअप साकारला, ही गोष्ट मला काही पटत नाही. मी खूप विचार करून “बाजी’ मधील स्त्री भूमिका साकारली होती. मला महिला दाखवण्याची संपूर्ण जबाबदारी मी मेकअप कलाकारावर टाकून मोकळा झालो नव्हतो. कारण मला हे चांगले ठाऊक होते की ही भूमिका पडद्यावर मला साकारायची आहे. त्यामुळे त्या भूमिकेचा गेटअप मला समाधानकारक वाटला पाहिजे. अर्थात स्त्री पात्र साकारताना गेटअप करणे अवघड आहे. त्यासाठी त्या भूमिकेत शिरून महिलांसारखे विचार, वर्तणूक आत्मसात करावे लागतात. त्यामुळे अशा भूमिका अभिनेत्याला स्वतःला समाधान देतातच पण प्रेक्षकांचेही मनोरंजन करतात.

तरुण डिझायनर उमैर जाफर यांनी आपल्या नव्या चित्रपटातील काही भूमिकांसाठी ड्रेस डिझायनिंग केले. उमैर सांगतो की, काही गंभीर काम करायचे असेल तर अशा पात्रांसाठीचे कपडे डिझाईन करणे कठीण असते. चित्रपटातील पुरुष पात्राला स्त्री पात्राचे कपडे घातले जाणार असल्याने विशेष काळजी घ्यावी लागते. कारण तो पोशाख घालून ती व्यक्‍ती स्त्री दिसणे महत्त्वाचे असते. “रफूचक्‍कर’ या जुन्या चित्रपटात ऋषी कपूरने महिलेची भूमिका साकारली होती. आपल्या या जुन्या चित्रपटाची आठवण म्हणजे एक संस्मरणीय अनुभव असल्याचे ते मानतात. ते सांगतात की, अशा प्रकारचे पात्र जर कथेचा मुख्य भाग असेल तर ही गोष्ट नक्‍कीच कठीण आहे. “चाची 420’मधील कमल हसनची भूमिका आपण दंग होऊन पाहात राहिलो. एखाद्या व्यक्‍तीने आपल्यामध्ये बदल करून ही भूमिका सिद्ध करणे ही सर्वच अभिनेत्यांना जमणारी गोष्ट नाही. त्यानंतरही कमल हसनने “दशावतरम’ मध्ये 90 वर्षांच्या म्हातारीची भूमिका साकारली. “लावारिस’ चित्रपटात मेरे अंगने में या गाण्यात अमिताभने महिलेचे पात्र साकारले होते. जुन्या जमान्यातील अशोककुमार, किशोरकुमार, विश्‍वजीत, जॉय मुखर्जी, शम्मी कपूर, महमूद, शशी कपूर, पेंटल, विनोद मेहरा यांनी स्त्री पात्रे साकारली आहेत. स्त्री पात्र साकारताना कुठेही उच्छृंखल न होता ते साकारण्याचे धनुष्य कलाकारांना पेलावे लागते.

सोनम परब

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here