बकेट लिस्ट…

त्या रात्रीचे 12 वाजले होते. शुभमने बेडरूममधून आवाज दिला, ‘आई, मला एक कप कॉफी.’ ‘शुभम, ही काय वेळ आहे का कॉफी घ्यायची?’ ‘अगं आई एक इम्पॉर्टन्ट काम करतोय आणि जरा मूड पण फ्रेश होईल. दे ना करून प्लिज.’ ‘बरं बाबा देते.’ असं म्हणत आई किचनमध्ये गेली. जरा वेळाने ती कॉफी घेऊन शुभमच्या रूममध्ये आली. शुभम भिंतीवर कसलेतरी फोटो चिटकवत होता आणि त्याखाली काहीतरी लिहीत होता. ‘ही घे गरमागरम कॉफी आणि शुभड्या हे काय चिटकवतोस भिंतीवर?’ ‘सांगतो. आधी मला कॉफीचा एक सिप घेऊ दे.’ शुभमने म्युझिक सिस्टीम चालू केली आणि वाफाळलेल्या कॉफीचा एक जोराचा फुरका ओढला. ‘एकदम कडक. मम्मा, ही आहे माझी बकेट लिस्ट.’ आईने भिंतीकडे पाहिलं, ‘बकेट लिस्ट म्हणजे?’ ‘बकेट लिस्ट म्हणजे, मनातल्या राहून गेलेल्या अशा काही गोष्टी ज्या आपल्याला पूर्ण कराव्याशा वाटतात. आपण हे जग सोडून जाण्यापूर्वी! थोडक्‍यात काय, तर मरणापूर्वी ते आयुष्य जगून घ्यायचं जे जगायचं राहून गेलं होतं.’ ‘शुभड्या, काय रे अशा मरणाच्या गोष्टी करतोस? माझं आयुष्य तुला मिळो आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो.’ ‘मम्मा, अगं मला असं म्हणायचंय की आपण पाहिलेली सगळी स्वप्नं पूर्ण करायची.’ ‘मग असं साधं सरळ बोल ना रे राजा, कशाला उगाच ते जडजड शब्द वापरतोस! बरं, कशाने भरलीय तुझी बकेट लिस्ट, कळेल का मला?’

शुभमने हातातला कप खाली ठेवला आणि भिंतीजवळ उभा राहिला. ‘आई, हे आहे पॅरिसमधलं आयफेल टॉवर आणि हे ऑस्ट्रेलियामधलं ओपेरा हाऊस. मला तिथं जायचंय आणि तेही विमानाचं फर्स्ट क्‍लास तिकीट काढून आणि याला म्हणतात स्काय डायविंग. म्हणजे छत्रीद्वारे विमानातून झेप घेणे. मला स्काय डायविंगबरोबरच स्कुबा डायविंग पण करायचंय!’ ‘आता याला काय म्हणतात?’ ‘म्हणजे मला पाण्याखाली असलेल्या स्वप्नवत जगाची सफर करायचीय. रंगीबेरंगी मासे, प्रवाळ हे सगळं अगदी जवळून बघायचंय. जिवंत माशाच्या समोरासमोर जाऊन त्याची मिशी ओढायचीय.’ हे ऐकून शुभमची आई हसू लागली. ‘बर, आणखी काय काय करायचंय?’ ‘बंगी जम्प, क्रुजमधून प्रवास, रॉक क्‍लायम्बिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला टाइम ट्रॅव्हल करायचंय!’ ‘शुभड्या, यातलं थोडंफार समजलं पण हे टाइम ट्रॅव्हल नाही कळलं.’ ‘टाइम ट्रॅव्हल म्हणजे ज्यात आपण भूतकाळात आणि भविष्यकाळात जाऊन येऊ शकतो.’ ‘खरंच असं होतं का रे?’ ‘डोन्ट नो.’ ‘मम्मा ते सोड. मला हे सांग तुला नाही कधी वाटलं बकेट लिस्ट बनवावी?’

‘खरं तर बकेट लिस्ट म्हणजे काय ते आज समजलं आणि तुझ्या वयात असताना माझी एवढी मोठमोठी स्वप्नं नव्हती. मुळात आमच्या काळात सगळं कसं अगदी मोजूनमापून असायचं. तू मघाशी सांगितलंस ना पॅरिस, ऑस्ट्रेलिया ते आम्ही फक्‍त भूगोलाच्या पुस्तकातच पाहिलं होतं. नकाशावर सरांनी दाखवलेल्या मार्गाने आमची बोटं फक्‍त तिथे जाऊन आली बघ! टेबलावरचा जगाचा नकाशा गोलगोल फिरवताना अख्ख जग पालथं घातल्यासारखं वाटायचं! स्काय डायविंग नाही पण शेतात उभारलेल्या माळ्यावरून गवताच्या पेंडीवर आम्ही धपाधप उड्या मारायचो. लहानपणी तुझ्या मावशीने हात मोडून घेतला होता, ‘स्काय डायविंग’ करताना!’ असं म्हणून शुभमची आई हसू लागली. ‘आमच्यासाठी विहिरीवर पोहायला जाणं हे काही कमी नव्हतं, तुझ्या स्कुबा डायविंगपेक्षा! पोहायला शिकत असताना एकदा माझ्या पाठीवर बांधलेली लाकडाची मोळी निसटली. मग काय, मी पाण्यात आणि ती मोळी पाण्यावर! विहिरीत गटांगळ्या खाताना चांगलीच घाबरले होते. नशीब, तुझ्या मामाने उडी घेतली आणि मला वाचवलं! त्यानंतर आमची रोज भेट होऊ लागली कधी माशांबरोबर तर कधी शेवाळाबरोबर!’

तुझ्या आजोबांना गड-किल्ले भ्रमंती खूप आवडायची. सोबत आम्हालाही घेऊन जायचे. खासकरून दिवाळी सुट्टी लागली की आमची मोहीम आखली जायची. ‘पोरांनो, लाडू दणकून खायचे. उद्या राजगड सर करायचा आहे!’ मग काय, सोबत पाण्याची बाटली, खाण्याचे साहित्य, माकडटोपी, चादर, बॅटरी असं सगळं घेऊन आम्हा बहीणभावंडांची फौज मागे आणि तुझे आजोबा पुढे! रात्री किल्ल्यावर आकाशातल्या चांदण्यांकडं पाहात अण्णांच्या तोंडून शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा ऐकताना असं वाटायचं ही रात्र कधी संपूच नये. तुझ्या रॉक क्‍लायम्बिंगसारखंच थोडंसं ऍडव्हेंचर मी पण केलंय म्हंटल!’

बाबा गेल्यानंतर कितीतरी दिवसांनंतर आईला असं भरभरून बोलताना शुभम पाहात होता. ‘शुभड्या, आपलं मन अशा कितीतरी इच्छाआकांक्षांनी काठोकाठ भरलेलं असतं! काही स्वप्न नकळत जगली जातात तर काही स्वप्नच राहतात! वाढत्या वयासोबत या इच्छा बदलूही शकतात. तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर बकेट लिस्टमधली यादी वाढूही शकते किंवा कमीही होऊ शकते. तुझ्या बाबाची खूप इच्छा होती मी गाणं शिकावं.’ ‘आणि तुझी?’ ‘माझी तर लहानपणापासूनच होती. पण दिवस सरत गेले आणि हे स्वप्न कधी मागे पडलं कळलंच नाही.’

शुभमने आईचा हात हातात घेतला. ‘आई, तू मला विचारलं होतस ना, की टाइम ट्रॅव्हल करता येतं का? तर हो. येतं करता. बघ ना, तुला तरी कळलं का कधी तू तुझ्या भूतकाळात जाऊन आलीस!’ ‘हो रे शुभड्या, बोलता बोलता किती जुन्या आठवणी जाग्या झाल्या.’ ‘आई, आता तुला मी भविष्यकाळात घेऊन जाणार.’ ‘मला नाही कळलं.’ ‘म्हणजे असं, माझी बकेट लिस्ट मी आणि तू मिळून पूर्ण करायची. देशील ना साथ मला? आणि हो उद्याच गायन क्‍लासची चौकशी करून त्यात तुझं नाव देतो. बाबाचं आणि तुझं स्वप्न पूर्ण करायचं.’ आईने शुभमच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि त्याच्याकडे पाहून हसू लागली. ‘शुभड्या, आता माझं एकच स्वप्न आहे. तुझ्या ‘बकेट लिस्ट’ मधली तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत, बस्स एवढंच!’

अमोल भालेराव

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here