तळेगाव दाभाडे – मोठी परंपरा लाभलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची सांगता तळेगाव दाभाडे शहरात होत आहे, ही बाब गौरवास्पद आहे. ती त्याच भव्यतेने करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे मत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी येथे व्यक्त केले.
सांगता समारंभ येत्या बुधवारी (दि. २४) होणार असून त्यानिमित्त मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या सांगता समारंभाच्या मंडपाचे भूमिपूजन तसेच व्यासपीठ व मुख्य प्रवेशद्वाराचा नामकरण कार्यक्रम झाला. त्यावेळी आमदार सुनील शेळके बोलत होते. या वेळी नाट्य परिषद तळेगाव शाखेचे विश्वस्त सुरेश साखवळकर, पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कलापिनेचे मुख्य विश्वस्त डॉ. अनंत परांजपे, तळेगाव नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, हरिश्चंद्र गडसिंग, रामभाऊ गवारे, बिजेंद्र किल्लावाला आदी उपस्थित होते.
सांगता समारंभ कार्यक्रमास मावळ व पुणे जिल्ह्यातील नाट्य रसिक व समस्त नागरिकांनी उपस्थित राहून हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी करावा, असे आवाहन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी येथे केले.
भाऊसाहेब भोईर म्हणाले की, तळेगाव नगरी ही कलाकार निर्मितीचे विद्यापीठ असून त्या नगरीचे ऋणानुबंध कायम आमच्याशी जोडले आहेत. हा समारंभ होत असलेल्या मुख्य व्यासपीठाला ज्येष्ठ साहित्यिक कै. गों. नी. दांडेकर यांचे नाव तर मुख्य प्रवेशद्वारास सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रवेशद्वार असे नाव देण्याची घोषणा सुरेश धोत्रे व भाऊसाहेब भोईर यांनी केली.