पाटण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने राज्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार
पाटण – एखादा गुन्हा घडतो तेव्हा पहिली माहिती मिळणारा माणूस पोलीस पाटील असतो. समाजातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस पाटील हा महत्वाचा दुवा आहे. सध्या त्यांना कमी वेतनात काम करावे लागत आहे. त्यामुळे पोलीस पाटील यांची मानधनाची आणि भवनासाठीची मागणी रास्तच आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पोलीस पाटील यांच्या सर्व मागण्या सोडविण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटना पाटण तालुका यांच्या वतीने राज्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल ना. शंभूराज देसाई यांचा पाटण येथील प्रतीक्षालय कार्यालयात भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रवींद्र माने, पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात, वनक्षेत्र अधिकारी अमित भोसले, सपोनि एम. एस. भावेकट्टी, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष सुभाष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. देसाई म्हणाले, “”पोलीस पाटलांच्या अनेक अडचणी होत्या. त्यांनी आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले होते.
त्यावेळी त्यांना वेळोवेळी भेटलो होतो. पोलीस पाटील यांच्या मानधनाबाबत तत्कालीन गृहमंत्री केसरकर यांच्याशीही आम्ही आमदार मंडळी भेटलो व पोलीस पाटील यांच्या अडचणी सांगितल्या. डोंगराळ भागात काम करताना अनेक अडचणी येतात. मानधन वाढीसाठी आम्ही प्रयत्न केले. आताची मानधन वाढीची मागणीही रास्त आहे. पोलीस पाटील यांच्या भवनासाठी शासकीय जागा उपलब्ध असेल तर सांगा.
निधी कसा आणायचा हे मी बघतो.” पोलीस पाटलांविषयी मला नेहमीचं सहानुभूती होती व इथून पुढेही राहणारच. पोलीस पाटलांच्या बाबतीत काही अंशी तक्रारी येतात. मात्र, पोलीस पाटील म्हणून काम करताना कामाचा दर्जा ठेवा. सर्वांना समान न्याय द्या व कामामध्ये कुठेही राजकारण आणू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रांताधिकारी तांबे म्हणाले, “शासन, प्रशासन आणि गाव यांच्यातील दुवा पोलीस पाटील आहे. पोलीस पाटलांच्या शासनाकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या काही अंशी योग्य आहेत. प्रशासनाच्या विविध योजना त्यांनी समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात. पोलीस पाटील यांची 145 पदे भरली असून उर्वरीत पदेही लवकरच भरली जातील.’ पोलीस पाटील यांनी गाव एक घटक म्हणून चांगले काम करावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी अशोक थोरात यांनी मार्गदर्शन केले. ना. शंभूराज देसाई यांचा पोलीस पाटील संघटनेच्यावतीने वहीतुला करण्यात आली. अध्यक्ष सुभाष पाटील यांनी प्रास्ताविकात पोलीस पाटील यांच्या अडचणी मांडल्या. कार्यक्रमास उपाध्यक्ष राम यमकर, नितीन पाटील, राहुल सत्रे यांच्यासह पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी, पोलीस पाटील उपस्थित होते.