शरद पवारांनी केले सुरेंद्र गुदगे यांचे कौतुक; भाऊसाहेब गुदगे यांच्या समाधीला मान्यवरांची पुष्पांजली
मायणी – जागरुक लोकप्रतिनिधी भाऊसाहेब गुदगे आपल्यात नसल्याचे दुःख असून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील कामाचा दिलेला वारसा त्यांचे पुत्र सुरेंद्र गुदगे यांनी पुढे सुरू ठेवल्याचे समाधान आहे. त्यांच्या शिक्षण संस्थेला शासनाच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.
मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या भारतमाता विद्यालयाच्या प्रांगणात शरद पवार यांचा सत्कार व माजी आमदार भाऊसाहेब गुदगे यांच्या समाधीस पुष्पांजली वाहण्याचा कार्यक्रम आज झाला. त्यावेळी ते बोलत होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आबासाहेब देशमुख, सत्यजित पाटणकर, पंचायत समितीच्या सभापती रेखा घाडगे, बाजार समितीचे सभापती विजय काळे, समाजकल्याण समितीच्या सभापती कल्पना खाडे, मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव सुधाकर कुबेर व पदाधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले, राज्यात झालेल्या सत्ताबदलाने जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा प्रयत्न आहे. खटाव तालुक्यात मायणीशेजारी साखर कारखाना सुरू आहे. कारखानदारी वाढली तरच प्रगती होते. तालुक्याच्या पाणीप्रश्नासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल.
ना. बाळासाहेब पाटील म्हणाले, भाऊसाहेब गुदगे यांनी सलग वीस वर्षे या तालुक्यात खंबीर नेतृत्व दिले होते.
दुष्काळी भागाच्या पाणीप्रश्नाचा पाठपुरावा करणारा नेता म्हणून त्यांचा लौकिक होता. आता जनतेच्या मनातील सरकार सत्तेत आले असून कृषी क्षेत्रात परिवर्तन करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. पूर्वीच्या सरकारने सहकार क्षेत्राबद्दल वेगळी भूमिका घेतल्याने हे क्षेत्र मोडून पडते की काय, अशी स्थिती होती. मात्र, आमचे शासन सहकार क्षेत्रास उभारी देईल.
सुरेंद्र गुदगे म्हणाले, भाऊसाहेब गुदगे यांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभास शरद पवारांना येता आले नव्हते. त्यामुळे आज ते जाणीवपूर्वक मायणीत आल्याने कार्यकर्त्यांना हत्तीचे बळ आले आहे. संस्थेच्या नूतन इमारतीसाठी मदत देण्याचा प्रयत्न करावा.