पालिकेच्या सायकल क्‍लबकडे पुणेकरांची पाठ

अवघे 700 सदस्य : प्रतिसाद वाढविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा
महापालिकेकडून शहरात ठिेकठिकाणी जाहिरात करूनही प्रतिसाद नाही

पुणे – तब्बल 36 लाख खासगी वाहनांची संख्या असलेल्या पुणे शहरात सायकल वापरास प्रोत्साहन तसेच चालना देण्यासाठी महापालिकेकडे अवघ्या 700 पुणेकरांनी रस दाखविला आहे. त्यातही 60 टक्के महापालिकेचे अधिकारी तसेच असून उर्वरीत 40 टक्के पुणेकर आहेत. त्यामुळे शहराच्या प्रदूषण तसेच स्वत:च्या आरोग्यासाठीही पुणेकरांना सायकल चालविण्यात रस नसल्याचे समोर आले आहे.

महापालिकेकडून शहरातील पर्यावरण संवर्धनासह सायकलींचे शहर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी “पब्लिक बायसिकल शेअरिंग’ योजना राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत पुढील काही वर्षांत पुणेकरांसाठी तब्बल 1 लाख सायकल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेचा प्रचार तसेच प्रसार करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा सायकल क्‍लब पालिकेकडून स्थापन करण्यात आला होता. मात्र, या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात नागरिकांनाही सहभागी करून घेण्यासाठी पालिकेकडून पुणे सायकल क्‍लब सुरू करण्यात आला आहे. त्याच्या प्रचार, प्रसारासाठी महापालिकेकडून शहरात मोठ्या प्रमाणात जाहिरातही करण्यात आली. मात्र, त्यास पुणेकरांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. ही नोंदणी सुरू झाल्यापासून गेल्या 15 ते 20 दिवसांत अवघ्या 200 नागरिकांनीच या क्‍लबमध्ये नाव नोंदणी केली आहे. तर महापालिकेचे 500 कर्मचारी आहेत.

रस्ते द्या, मग सायकल चालवू
महापालिकेने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरही या योजनेची जाहिरात करत या क्‍लबमध्ये सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. मात्र, पुणेकरांकडून या आवाहनाचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे. “शहरातील रस्ते ठीक नाहीत’, “तक्रारीशिवाय खड्डे दुरूस्त होत नाहीत, असे असताना क्‍लब उघडण्यापेक्षा महत्त्वाची कामे करा’ असे महापालिकेस सुनावण्यात आले आहे. तर अनेक पुणेकरांनी महापालिकेच्या या उपक्रमाचे कौतुकही केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.