मंचर- नागापूर (ता. आंबेगाव) येथील मिंडे मळ्यात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात शनिवारी (दि. 1) पहाटे साडेसहाच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला असल्याची माहिती तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांनी दिली.
गेल्या दोन महिन्यांपासून नागापूरच्या उत्तरेला असलेल्या मिंडे मळ्यात बिबट्याचा वावर होता. शेतकऱ्यांना शेतीकामे करताना अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले होते. तीन दिवसांपूर्वी शेतकरी सोमनाथ मिंडे, तेजस मिंडे हे शेतात काम करत असताना बिबट्याच त्यांच्यावर गुरकला होता.
या प्रकारामुळे शेतकरी वर्गात प्रचंड घबराट पसरली होती.सरपंच सुजाता रिठे, पोलीस पाटील संजय पोहकर यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. ग्रामपंचायतीच्या वतीने वनविभागाला पिंजरा लावण्याबाबतचे निवेदन देण्यात आले होते. वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने मिंडे मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. पकडलेला बिबट्या नर जातीचा असून साडेतीन वर्षे वयाचा आहे. या बिबट्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्रात सोडण्यात आले आहे.