साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न द्या

पालकमंत्री जयंत पाटील यांची केंद्र सरकारकडे मागणी

100 व्या जयंती दिनी अण्णा भाऊ साठे यांना वाटेगाव येथे अभिवादन

सांगली : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारकडे आग्रहाने केली आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी स्वातंत्र्य चळवळीत आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत समाज मन जागविण्याचे काम स्वतःच्या शाहिरीतून आणि प्रतिभेतून केले आहे. प्रतिभावंत आणि संपूर्ण महाराष्ट्राला मार्गदर्शक असणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करावे, अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त आग्रहाने केल्याचे सांगितले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंती निमित्त आज वाटेगाव येथे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्यहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी आमदार मानसिंग नाईक, पंचायत समिती सभापती शुभांगी पाटील, उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रविंद्र सबनीस यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

तदनंतर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री जयंत पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जुन्या घरास भेट देऊन अण्णा भाऊ यांच्या प्रतिमेस पुष्यहार करून अभिवादन केले व येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर साकारलेल्या शिल्पसृष्टीची पाहणी केली. यावेळी वाटेगावचे सरपंच सुरेश साठे, अण्णा भाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्री साठे व कुटुंबीय उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.