पिंपरी -उन्हाळा म्हटले की, महिलांची लगबग असते ती वर्षभरासाठी अन्नाची चव वाढविणारे व जेवणाच्या ताटाची शोभा वाढविणारे रुचकर पदार्थ बनविण्याची. मात्र, यंदा लिंबाने चांगलाच भाव खाल्ल्याने आंबटगोड चवीचे लोणचे चाखायला कमी मिळणार असल्याचे चित्र आहे. मात्र, सध्या बाजारात गावरान कैरीची चांगली आवक होत अल्याने कैरीचे लोणचे बनविण्याची तयारी दिसून येत आहे.
उन्हाळ्यात वर्षभरासाठी लागणारे वाळवणाचे पदार्थ बनविले जातात. त्यात कुरडई, विविध प्रकारचे पापड, शेवई, वेफर्स, सांडगे, ताकातली मिरची, वाळवलेल्या गवारीच्या शेंगा, कारले यांचा समावेश आहे. घरी असणाऱ्या महिलांच्या हाताला दिवसभर हे काम असते. त्यामुळे वर्षभर घरातील कुटुंबीय या पदार्थांची चव हवी तेव्हा चाखतात. उन्हाळ्यातच वर्षभरासाठी कैरी आणि लिंबाचे आंबटगोड लोणचे बनविले जाते. त्यामुळे महिलांची बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी असते. मात्र, यंदा लिंबाने चांगलाच भाव खाल्ल्याने लिंबाचे लोणचे जरा जास्तच आंबट झाल्याचे दिसून येत आहे.
यंदाचा उन्हाळा जरा जास्तच कडक असल्याने लिंबाने चांगलाच भाव खाल्ला. यंदा प्रतिकिलोला 200 रुपयांपेक्षा अधिक भाव मिळाला. त्यामुळे ऐन एप्रिल-मे महिन्यात लिंबू घेणे परवडेनासे झाले. रविवारीही 20 रुपयांना 3 ते 4 लिंबू असा भाव होता. मात्र, बाजारात गावरान कैरीची मोठी आवक होत आहे. त्याचा भाव 30 ते 45 रुपये प्रतिकिलो आहे. त्यामुळे वर्षभरासाठी लागणारे लोणचे बनविण्यासाठी कैरीची खरेदी करत आहेत.
घरच्या लोणच्याची चवच न्यारी
तयार लोणच्यापेक्षा घरच्या लोणच्याची चवच न्यारी. बाजारातून लिंबू, कैऱ्या विकत घेणे, कैऱ्या फोडणे, त्यात तयार किंवा घरी बनविलेला मोहरीची डाळ, मेथ्या, लवंग, मिरी, मीठ, बडीशेप, हिंग यांचा मसाला घातला जातो. त्यामुळे घरच्या लोणच्याची चव जिभेवर रेंगाळत रहाते. प्रत्येक वर्षी आम्ही घरी लोणचे तयार करतो. तसेच ते इतर नातेवाइकांनाही दिले जाते, असे प्रियांका गायकवाड यांनी सांगितले.
लिंबाचे दर कमी झाल्यावर नियोजन
लिंबाचे लोणचे थोडे उशिरा करण्याचा बेत महिलांनी आखला आहे. लिंबू, हिंग, साखर, गूळ, हळद, मीठ घालून आंबट गोड लोणचे बनविले जाते. सध्या लिंबाचा भाव 20 रुपयांना 3 ते 4 असा आहे. त्यामुळे सध्या थोडे लोणचे करणार असून भाव कमी झाल्यावर पुन्हा लोणचे करण्याचे नियोजन आहे.