लेह – हिमालयातील डोंगराळ रस्त्यांवरून प्रवास करण्याची आवड असलेल्या पर्यटक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचा केलांग डेपो 2 जूनपासून देशातील सर्वात लांब आणि सर्वोच्च मार्गावर लेह-दिल्ली अशी बस सुरु करत आहे. महामंडळ व्यवस्थापनाला जिल्हा प्रशासनाकडून परवानगी मिळताच लेहसाठी बससेवा सुरू होईल. जिल्हा प्रशासनाने मनाली-सरचू-लेह हा रस्ता 2 जूनपासून सर्व वाहनांसाठी खुला करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे ही बससेवा 2 जूनपासून सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या वर्षी 15 जून रोजी दिल्ली-मनाली-सरचू-लेह बससेवा सुरू झाली होती. यावेळी वेळेपूर्वी बस सुरू होणार आहे. यामुळे महामंडळाच्या नावावर नवा विक्रम होणार आहे. लेह ते दिल्ली असा 1,026 किमीचा 30 तासांचा प्रवास सर्व प्रवासी केवळ 1,740 रुपयांमध्ये करू शकतील. या मार्गावर दिल्ली, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि लेह-लडाखला भेट देण्याची संधी मिळते.
यावेळी, देश-विदेशातील पर्यटक जूनच्या सुरुवातीलाच लेह आणि दिल्ली दरम्यानच्या रोमांचक बस प्रवासाचा आनंद घेतील. एचआरटीसी केलॉन्ग डेपोचे प्रादेशिक व्यवस्थापक अंशित शर्मा यांनी सांगितले की जर 2 जूनपासून सरचूमार्गे लेहला जाण्यासाठी सर्व वाहनांची वाहतूक सुरू झालीतर त्याच दिवसापासून ही दिल्ली-लेह बससेवा सुरू होणार आहे.
मनाली-लेह मार्गावर, प्रवाशांना 16,500 फूटांवर बरलाचा, 15,547 फूटांवर नकिल्ला, 17,480 फूटांवर तांगलांगला आणि 16,616 फूटांवर लाचुंग पासचे सुंदर दृश्य पाहायला मिळेल. महामंडळाचे तीन ड्रायव्हर आणि दोन कंडक्टर लेह-दिल्ली मार्गावर सेवा देतील. लेहहून निघताना पहिला ड्रायव्हर केलॉन्गला बस घेऊन जातो. दुसरा ड्रायव्हर केलॉन्ग ते सुंदरनगर आणि तिसरा ड्रायव्हर सुंदरनगर ते दिल्लीपर्यंत आपली सेवा देईल. तसेच हे ऑपरेटर्स मार्गावरील निसर्गरम्य पर्यटनस्थळांची माहितीही प्रवाशांना देतील.