आज सह्याद्रीवर होणार बैठक
मुंबई: हक्काच्या पगारासाठी आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराचे मंगळवारी संतप्त पडसाद उमटले. या शिक्षकांच्या मागण्यांना पाठिंबा देत विधान परिषदेतील आमदारांनी विधानभवनासमोर ठिय्या आंदोलन केले. विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळालेच पाहिजे अशा घोषणाबाजी करीत त्यांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार यांनी शिक्षकांच्या मागण्यांबाबत उद्या, सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आमदारांनी आंदोलन स्थगित केले.
विनाअनुदानित शाळांना 100 टक्के अनुदान मिळावे या मागणीसाठी गेल्या कित्येक दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर व्हावे या मागणीसाठी शेकडो शिक्षक शाळा बंद ठेवून आंदोलनात उतरले होते. आंदोलनादरम्यान शिक्षकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे गोंधळाची स्थिती उद्भवल्याने पोलिसांनी या शिक्षकांवर लाठीमार केला.
या लाठीहल्ल्यात शिक्षक आमदार ना. गो. गाणार यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. यामुळे संतप्त झालेले शिक्षक आमदारांनी गाणार यांना केलेल्या मारहाणीचा निषेश करण्यासाठी तसेच शिक्षकांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी विधान भवनासमोर ठिय्या देऊन बसले. आमदार विक्रम काळे, श्रीकांत देशपांडे, दत्ता देशपांडे, दत्तात्रय सावंत, बाळाराम पाटील, सुधीर तांबे यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यांना विधान भवनात बसण्यात मज्जाव करण्यात आल्यानंतर या आमदारांनी विधान भवनाच्या प्रवेशद्वारासमोरच या आमदारांनी ठिय्या दिला. यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही या आमदारांना पाठिंबा देण्यासाठी विधान भवनात पोहोचले.
त्यानंतर पुन्हा या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन सुरू केले. भरपावसातही हे आंदोलन सुरूच होते. यावेळी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या आंदोलनकर्त्या आमदारांची भेट घेतली. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सभापतींची भेट घेऊन त्यांच्याकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.