पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत चिंचवड, लिंक रोड येथे उभारण्यात आलेल्या दोन इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही इमारतीमध्ये 224 सदनिका आहेत. या सदनिकांची शुक्रवार (दि.8) रोजी संगणकीय सोडत काढण्यात येणार होती. मात्र, महापालिकेने ही सोडत ऐनवेळी रद्द केली. त्यामुळे लाभार्थ्यांनी महापालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे कार्यालय गाठत सहाय्यक आयुक्तांकडे सोडत आजच्या-आजच करण्याची मागणी केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत चिंचवड, लिंक रोड ए आणि बी अशा दोन इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही इमारतीमध्ये प्रत्येकी 112 याप्रमाणे 224 सदनिका आहेत. येथील सदनिकांसाठी शुक्रवार (दि.8) रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी 11 वाजता संगणकीय सोडत काढण्यात येणार होती. मात्र, ही सोडत अचानक रद्द झाल्याने लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.
यादीत बदल करू नये
झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे यांना निवेदन देऊन आजच्या आज सोडत घेण्याची मागणी केली. तसेच आम्ही दिलेल्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये कोणताही बदल करू नये, आमच्या मागणीनुसार संगणकीय सोडत न काढल्यास ती आम्हाला मान्य नसून महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करू, असा इशारा माजी उपमहापौर जगनाथ साबळे, प्रतापसिंह खैरारीवा, अनिल सोनवणे, सुंदर कांबळे, सचिन साबळे, निलेश निकाळजे, नवनाथ म्हस्के, नागनाथ साबळे, विकास पिल्ले, किसन जाधव, अनिल साळवे यांनी दिला आहे. महापालिकेने अचानक सोडत रद्द केल्याने लाभार्थी नाराज झाले असून सोडत का रद्द केली याबाबत वेगवेगळ्या शंका व्यक्त केल्या जात आहेत. यामुळे लाभार्थ्यांच्या मनातील भीती वाढली आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचा पदभार गुरुवारीच स्वीकारला आहे. या विभागाची मला अजून माहिती घ्यायची आहे. वरिष्ठांच्या सुचनेनुसार शुक्रवारी होणारी सदनिकांची संगणकीय सोडत रद्द करण्यात आली आहे. लवकरच या सदनिकांसाठी सोडत काढण्यात येईल.
– सुषमा शिंदे, सहाय्यक आयुक्त, झोपडपट्टी पुनर्वसन विभाग