ऍसिडच्या टॅंकरला गळती; मुंबई महामार्गावरील वाहतूक बंद

चांदणी चौकातील घटना, रहिवाशांच्या डोळ्यांना त्रास

पुणे – ऍसेटिक ऍसिड वाहून नेणाऱ्या टॅंकरला गळती लागली. यातून मोठ्या प्रमाणात विषारी वायू पसरला. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री 10वाजण्याच्या सुमारास चांदणी चौकात घडली. या वायुमुळे स्थानिक नागरिकांच्या डोळे चुरचुरण्याचा त्रास सुरू झाला.

संबंधित टॅंकर साताऱ्याच्या दिशेने जात असताना चांदणी चौकात त्याला गळती लागली. ही माहिती मिळताच वारजे-कोथरूड येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत परिसरत हा वायू पसरला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. तर, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यालगत खोदून तेथील मातीच्या सहायाने ही गळती रोखली. गळती लागल्याची माहिती मिळताच संबंधित चालकाने टॅंकर जागेवरच थांबवला. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली.

Leave A Reply

Your email address will not be published.